अहमदनगर - घरात झोपलेल्या अकरा वर्षांच्या मुलीला मध्यरात्री पळवून नेऊन तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सोनई पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. प्रतिक आरण (रा. घोडेगाव, ता. नेवासा) असे आरोपीचे नाव आहे. दोन महिन्यानंतर त्याला पकडण्यात सोनई पोलिसांना यश आले आहे.
दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी हा प्रकार घडला होता. आरण याने काही मित्रांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून झोपलेली असताना उचलून नेले. हा प्रकार इरिगेशन कॉलनीजवळच्या झोपडीपट्टी परिसरात घडला. प्रतिक याने मुलीला इरिगेशन कॉलनीत पळवून नेऊन एका खोलीत कोंडून ठेवले होते.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली होती. फिर्यादीत अज्ञात चोरट्यांनी आपल्या मुलीचे अपहरण केल्याचे त्यांनी म्हटले होते. मुलीच्या अंगावर ओरखडे असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले हाेते. दरम्यान, या घटनेपासूनच प्रतिक गावातून परागंदा झाला होता. दिवाळीपूर्वी तो गावात परतला.
सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलिस कर्मचारी शिवाजी माने, चव्हाण, शेख, गायकवाड, गावडे यांनी त्याला गेल्या आठवड्यात ताब्यात घेतले. न्यायालयाने सुरुवातीला प्रतिकला 3 दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. चौकशी दरम्यान पोलिसांना वेगळी माहिती मिळाल्यामुळे या गुन्ह्यात नंतर 'बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉस्को) कायद्या'चे वाढीव कलम लावण्यात आले.
नंतर प्रतिक याच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ करण्यात आली होती. दरम्यान, या अटकेनंतर घोडेगाव येथील झोपडपट्टी परिसरातील आणखी काही जण परागंदा झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एपीआय ज्ञानेश्वर थोरात हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.