अहमदनगर - राहुरी तालुक्यातील कुख्यात गुंड हिंमत जाधव खून प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपींना १ लाख १९ हजार रुपये दंडाची शिक्षा देखील ठोठावली आहे. दि. १३ सप्टेंबर २०१६ रोजी नगर औरंगाबाद महामार्गावर इमामपूर घाटाजवळ हिंमत जाधवचा गोळ्या झाडून खून झाला होता.
कृष्णा अशोक कोरडे (वय २६, इंद्रानगर, मालगाव, जि. बीड), सोमनाथ भानुदास मोरे ( वय ३१ रा. शिंगणापुर, ता. नेवासा जि. अहमदनगर), आजिनाथ रावसाहेब ठोंबरे (वय २९,रा. जामगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद), रामचंद्र उर्फ राजू चिमाजी शेटे (वय ४४, वळणपिंप्री ता. राहुरी), संदिप बहिरूनाथ थोपटे (वय २९, रा. कृषी विद्यापीठ राहुरी, ता. राहुरी), राहुल बाळासाहेब दारकुंडे (वय २८ रा. मोरगव्हाण, ता. राहुरी), जावेद करीम शेख (वय ३६, रा. देवगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी हिंमत अभिमन्यू जाधव (वय ३२, रा. वळण, राहुरी) याचे गावातील वर्चस्व सहन न झाल्याने सुपारी देऊन व कट रचून त्यास गोळ्या घालून जीवे ठार मारले होते. याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी सर्व आरोपींना खून करणे, खुनाचा कट रचणे, आदी कायदा कलमान्वये दोषी धरून प्रत्येक आरोपीस आजन्म कारावासाची व एकूण १ लाख १९ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे ऍड. केदार केसकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी बी. बी. बांदल, दीपक गांगरडे, सहायक फौजदार एल एम काशीद, यांनी सहकार्य केले. बुधवारी कोर्टाचा निकाल सूनवण्याच्या वेळी न्यायालयात भिंगार पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला होता.
'एलसीबी'ने २४ तासांत पकडले आरोपी
तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजकुमार हिंगोले, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, पोलिस नाईक दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, राहुल हुसळे, बंटी सातपुते यांच्या पोलिस पथकाने चोवीस तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.
पोलिसांवर केला होता हल्ला
गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासांच्या आत मुख्य शार्प शूटर कृष्णा कोरडे व अजय ठोंबरे यांना ताब्यात घेत ४ पिस्तुले जप्त केली होती. त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी आरोपींना शिताफीने अटक केली होती.
अन तपासाला वेग आला..
मारला गेलेला हिंमत जाधव अनुसूचित जाती जमातीचा असल्याने या गुन्ह्यात अट्रोसिटीचे कलम लागले होते. तसेच तत्कालीन डीवायएसपी आनंद भोईटे यांच्याकडे तपास होता. नंतर नवीन आलेले डीवायएसपी मनीष कलवानिया यांनी तपास हाती घेत राजू शेटे याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तपासाला वेग आला होता.
यांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या
या खटल्यात सरकार पक्षातर्फे २५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी मयताचे वडील, बहीण, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तसेच तपासी अधिकारी डीवायएसपी मनीष कलवानिया, आनंद भोईटे, सीसीटीव्ही एक्सपर्ट व्रजेश गुजराती, शवविच्छेदन करणारे औरंगाबाद येथील डॉक्टर, सीसीटीव्ही फोटो तज्ञ, यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.