आप्पासाहेब ढुस यांची चौकशीची मागणी
राहुरी - देवळाली प्रवरा हद्दीतील श्रीशिवाजीनगर (राहुरी फॅक्टरी) येथील सेंट्रल बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या कर्ज माफीचा रकमेत आढळून येणारी तफावत संशयास्पद असून या घटनेची चौकशी करण्याची मागणी आप्पासाहेब ढुस यांनी तहसीलदार फसीयोद्दीन शेख साहेब यांच्याकडे केली आहे.
ढुस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे की, राहुरी फॅक्टरी येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांना शासनाकडून आलेल्या कर्ज माफीच्या रकमेत तफावत आढळून येत आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफीच्या केवळ ८५% रकमा शासनाकडून प्राप्त झाल्याचे सांगितले.
पुढील कर्ज देणेसाठी शेतकऱ्यांकडून व्याज आणि उर्वरित मुद्दलीच्या नावाखाली मोठ्या रकमेची सक्त वसुली केली जात आहे. काही शेतकऱ्यांना शासनाकडून कर्ज माफीच्या कमी रकमा प्राप्त झाल्याचे सांगून संबंधित शेतकऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय या रकमा बँकेने शासनाला परत पाठविल्या आहेत व या शेतकऱ्यांना थकबाकीत ठेवले आहे.
काही शेतकऱ्यांचे शासनाच्या कर्जमाफी यादीमध्ये नाव आलेले असताना बँकेत रक्कमच आली नसल्याचे बँकेने सांगितल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कर्जमाफीची रक्कम कमी आली म्हणून शासनाला पैसे परत पाठविणे, तसेच ८५% रक्कम आली असे सांगून दंड व्याजासह उर्वरित रकमा भरून घेऊन पुढील कर्ज वितरण करणे, आणि काही शेतकऱ्यांचे पैसेच आले नाही, असे सांगून त्यांना थकबाकीत ठेवले.
राहुरी फॅक्टरी येथील सेंट्रल बँकेत आढळून येणाऱ्या या सर्व घटना संशयास्पद असल्याने या घटनेची तात्काळ चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन लिहिले आहे. त्याची एक प्रत तहसीलदारांना देण्यात आली.
हे निवेदन तहसीलदार यांना देताना राहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे, किशोर खपके, रवींद्र खपके, अशोक खपके, गंगाधर बटवाल, रोहिदास खपके, शरद होन, सुदाम पागिरे, शंकर पागिरे आदीसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.