राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन

मुंबई - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांचे कोरोना आजारामुळे निधन झाले. ही बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीने झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, भारतनानांचे नेतृत्व हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरुप झालेले नेतृत्व होते. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता. पंढरपूर-मंगळवेढ्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केले. 

सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवला. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांचा प्रयत्न असायचा. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण, समाजकारण करणारे त्यांचे नेतृत्व होते. 

भारतनाना भालके यांचे अचानक निघून जाणे ही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची, राष्ट्रवादी काँग्रेसची व माझीही वैयक्तिक हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !