अहमदनगर - बनावट डिझेल प्रकरणी पाठविण्यात आलेला नमुन्यांचा अहवाल नाशिक प्रयोगशाळेकडून अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाला आहे. आता या अहवालात काय आहे. याबाबत नगर जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे.
बनावट डिझेल प्रकरण तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक डाॅ. दत्ताराम राठोड यांच्या कार्यकाळात हे उघडकीस आले होते. यानंतर राठोड यांची अन्य कारणाने बदली झाली. पर्यायाने तो तपास नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी ढुमे यांच्याकडे देण्यात आला. नंतर तो तपास श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आला होता.
अपर पोलिस अधीक्षक राठोड यांच्या विशेष पथकाने शहरातील जीपीऔ चौकातील छावणी कॉम्प्लेक्समधील एका दुकानात बेकायदेशीर साठवून ठेवलेला २ हजार लिटर भेसळयुक्त डिझेलचा साठा जप्त केला होता. याबाबत गुन्हा नोंदवून तपास सुरु झाला आहे.
या कारवाईमध्ये एक टँकर व ट्रकसह एकूण साडेतेरा लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला़. पोलिसांनी केलेल्या कारवाईवेळी डिझेलचा काळाबाजार करणारा आरोपी गौतम वसंत बेळगे (वय ३८ रा़भगवानबाबा चौक, भिंगार) याला अटक केली आहे. बेळगे हा टँकरमधून ट्रकमध्ये डिझेल भरताना आढळून आला़. त्याच्याकडून १ हजार ९३७ लिटर डिझेल जप्त केले आहे.
जप्त केलेल्या डिझेलचे नमुने नाशिक येथील रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. पोलिस नाईक अरविंद रमेश भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.