पोलिस उपाधीक्षकांच्या विनंतीनंतर रस्ता रोको आंदोलन एका तासाने घेतले मागे, घोडेगाव कडकडीत बंद
अहमदनगर - घोडेगाव (ता. नेवासा) येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरात धाडसी चोरी करून दागिने नेणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना आणखी ७ दिवस मुदत देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी एक तास नगर औरंगाबाद महामार्गावर ग्रामस्थानी रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेवगाव उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी ग्रामस्थांना तपासाची माहिती दिली.
दि. १९ नोव्हेंबर रोजी घोडेगावचे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरात चोरट्यानी सुमारे १७ किलो चांदीचे दागिने चोरून नेले. या गुन्ह्याचा तपास लागत नसल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. १ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजता घोडेगाव चौफुल्यावर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनामुळे नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तासभर ठप्प झाली.
शेवगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी येऊन ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात सोनई पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. यापूर्वी राहाता, राहुरी, इतरत्र झालेल्या मंदिरातील चोरीच्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतलेले होते, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांना ग्रामस्थांनी सहकार्य केले, तसेच आणखी काही दिवस करावे, असे आवाहन त्यांनी केले.
त्यावर पोलिसांना आणखी ७ दिवसांची मुदत देण्यात आली. ७ दिवसांनंतर चोरट्यांचा आणि दागिन्यांचा तपास लागला नाही तर पुन्हा एकदा रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांच्या हस्ते उपअधीक्षक मुंडे आणि सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना लेखी निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनाच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस दलाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सोनई पोलिस दल, शनिशिंहणापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांच्यासह राज्य राखीव पोलिस दल, होमगार्ड्स, तैनात केलेले होते. पण ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत पोलिस प्रशासनाला सहकार्य केले.
घोडेगाव कडकडीत बंद
ग्रामदैवत घोडेश्वरी देवीचे दागिने चोरी केल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपींचा शोध लागत नसल्याच्या निषेधार्थ घोडे गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि व्यवसायिकांनी मंगळवारी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे.