घोडेश्वरी देवीचे दागिने सापडेनात म्हणून ग्रामस्थ पुन्हा करणार आंदोलन

अहमदनगर - घोडेगाव (ता. नेवासा) येथील श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरातून चांदीचे दागिने नेणाऱ्या चोरट्यांचा एक महिना होत आला तरी तपास लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा संतप्त झाले आहेत. पोलिसांनी खरे चोर जेरबंद करावेत, देवीचे चोरी गेलेले दागिने परत मिळावेत, या मागणीसाठी पुन्हा रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.


मंगळवारी ( दि. १५ डिसेंबर) रोजी घोडेश्वरी देवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबतचे लेखी निवेदन सोनई पोलिसांना देण्यात आले आहे.

दि. १९ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभार्‍याचे कुलूप तोडून चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेला एक महिना झाला आहे. सोनई पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. 

पण पोलिस कोठडी मिळवूनही या संशयित आरोपिकडून पोलिसांना काहीच निष्पन्न झाले नाही. तसेच चोरी गेलेले दागिने सापडलेले नाहीत. यापूर्वी ग्रामस्थांनी एकदा रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी संशयित आरोपी ताब्यात घेतल्याचे सांगून पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. 

याला पंधरा दिवस होत आले असले तरी अजूनही खऱ्या चोराचा आणि दागिन्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे घोडेगाव ग्रामस्थानी पुन्हा आंदोलनाचा निर्धार केला आहे. निवेदन देताना ग्रामस्थांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली. 

नाहीतर गुन्हा दाखल होईल..

सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे मंगळवारी सायंकाळी ग्रामस्थांच्या आवाहनानुसार मंदिराच्या आवारात आले. त्यांनी आचारसंहिता लागू असल्याने आंदोलन करु नका, असे आवाहन केले. तसेच जर आंदोलन केले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा दिला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. 

तर मग गुन्हे दाखल कराच !

पोलिसांना चोर सापडत नाहीत, दागिने सापडत नाहीत आणि ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याचा धाक दाखवला जातो, यावरून ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चोर आणि दागिने शोधून आणायचे सोडून पोलिस गुन्हे दाखल करायचे म्हणत असतील तर सर्वांवर गुन्हे दाखल करा, असे आव्हान देण्यात आले. 

त्या 'बोलबच्चन'ची चमकोगिरी

देवीचे दागिने चोरीचा विषय ग्रामस्थांच्या अस्मितेचा आहे, यात राजकारण आणू नका, असे एक व्यक्ती तावातावाने म्हणत होती. तसेच आतापर्यंत पत्रकारांनी किती बातम्या लावल्या, असा जाब त्याने विचारला. आजवरच्या बैठकांमध्ये वारंवार ही व्यक्ती पत्रकारांनी कोणाचेही नाव छापू नका असा आग्रह धरत होती. त्याला यावेळी मात्र पत्रकारांनी खडे बोल सुनावले.

'वैयक्तिक द्वेष' बाहेर दाखव

बैठकीत व्यक्तिगत द्वेषातून वारंवार पत्रकारांवर घसरणारी ही व्यक्ती एकीकडे कोणाला प्रसिद्धी देऊ नका म्हणायची, पण प्रत्यक्षात गेल्या वेळच्या रस्ता रोको आंदोलनात मात्र फोटोत 'झळकायला मिळावे' म्हणून निवेदन देणाऱ्या महिलांच्या मागे उभी होती, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यामुळे या 'बोलबच्चन'ची चमकोगिरी उघड झाली. "तुमचे वैयक्तिक द्वेष बाजूला ठेवा, अन आम्हाला पत्रकारिता शिकवू नका", अशा शब्दात पत्रकारांनी त्याला चांगलेच सुनावले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !