नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे व दुसरा आरोपी सागर भिंगारदिवे हे एकमेकांच्या संपर्कात होते. हत्याकांड झाले त्या दिवशी आणि त्याआधीही ते एकमेकांच्या संपर्कात आल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असा दावा सरकार पक्षातर्फे कोर्टात करण्यात आला आहे.
सागर भिंगारदिवे याने जुन्या रागातून बोठेला अडकविल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. न्यायालय बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी दि. १५ डिसेंबरला निकाल देणार आहे. मंगळवारी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी बोठे याने तो काम करत असलेल्या वृत्तपत्रात 'हनी ट्रॅप'संबंधी वृत्तमालिका लिहिली होती.
या वृत्तमालिकेमध्ये आरोपी सागर भिंगारदिवे याच्याबद्दल लिहिले होते. त्याचे उद्योग उघडकीस आल्यामुळे त्या त्याने या गुन्ह्यात बोठेचे नाव घेतले आहे. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी हा युक्तिवाद खोडून काढताना सांगितले की, या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. फक्त भिंगारदिवे याने नाव घेतले म्हणून बोठेला आरोपी केलेले नाही.
बोठे - भिंगारदिवे सतत संपर्कात
पोलिसांना बोठेविरुद्ध सबळ पुरावे मिळालेले आहेत. भिंगारदिवे आणि बोठे यांच्यात वैर असते तर ते एकमेकांच्या संपर्कात कसे होते, असा प्रश्न सरकारी वकील पाटील यांनी उपस्थित केला. दि. २४ नोव्हेंबर व ३० नोव्हेंबर या दिवशी या दोघांत मोबाइलवरून वेळोवेळी संभाषण झाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
'ते' पत्रही पोलिसांना सापडले
रेखा जरे यांच्या घरात पाेलिसांनी घेतलेल्या झडतीत त्यांच्याच हस्ताक्षरातील एक पत्र मिळाले आहे. त्यात आरोपीपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे लिहिलेले आहे. या सर्व पुराव्यांची पडताळणी करायची आहे. त्यासाठी आरोपीला अटक करणे आवश्यक आहे असेही पाटील यांनी न्यायालयात सांगितले.
अटक की जामीन? आज निर्णय..
न्यायालयाने आरोपी बोठेच्या वतीने अटकपूर्व जामिन अर्जावर युक्तीवाद करणारे वकील आणि जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील या दाेघांचाही युक्तिवाद ऐकून घेतला. यासंबंधीची कागदपत्रेही घेतली आहेत. त्यावर आता उद्या (बुधवारी) निकाल देण्यात येणार आहे.