रेखा जरे हत्याकांड
अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला 'मुख्य सूत्रधार' बाळ बोठे हा फरार झाला आहे. पण त्याला पळून जाण्यात मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांनी बोठेच्या घरातून परवाना असलेले पिस्तुल जप्त केले आहे. तसेच त्याच्या शोधासाठी 'लुक आऊट' नोटिस जारी केली आहे.
काही दिवसांपूर्वी नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. सुदैवाने त्यांच्यासोबत प्रवास करत असलेल्या त्यांच्या आईने आरोपींचा फोटो काढला. त्यामुळे मारेकऱ्यांपर्यंत पोचणे पोलिसांना सोपे झाले. पोलिसांनी सर्वांना चोवीस तासांच्या आत पकडले.
याप्रकरणी पोलिसांनी विविध पथके तयार करून राहुरी, श्रीरामपूर, राहाता परिसराशी कोल्हापूर येथून पाच आरोपींना घटनेच्या काही तासात मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस बोठेला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या बंगल्यावर गेले होते.
बलिकाश्रम रोडवर असलेल्या बोठे याच्या 'जिद्द' बंगल्याची पोलिसांनी कसून तपासणी केली पण बोठे तेथून पसार झालेला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पाच पोलिस पथके रवाना केली आहेत. गुन्ह्यात नाव निष्पन्न होताच बोठे याने शहरातून पळ काढला. जरे यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर, दुसर्या दिवशी अमरधाम येथे अंत्यविधीला उपस्थित असलेला बोठे नंतर मात्र फरार झाला.
घरातून पिस्तुल जप्त केले
बाळ बोठे याने पत्रकारिता करत असताना अनेकदा आपल्या जीवाला धोका असल्याचे भासवून पोलिसांत तक्रारी केलेल्या आहेत. त्याला अनेकदा पोलिस संरक्षणही दिलेले होते. तसेच शस्त्र परवाना देखील दिलेला होता. हे शस्त्र पोलिसांनी बोठे याच्या बंगल्यातून जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
'लूक आउट नोटीस' जारी
बाळ बोठे याच्याकडे पासपोर्ट आहे. त्यामुळे तो परदेशात पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर पोलिसांनी त्याच्या संदर्भात विमान प्राधिकरणला 'लुक आऊट' नोटीस जारी केलेली आहे. त्यामुळे तो विमानाने भारताबाहेर पळून जाण्याची शक्यता आता कमीच आहे.
'ते'देखील पोलिसांच्या रडारवर
रेखा जरे खून प्रकरणात नाव निश्पन्न झाल्यानंतर बाळ बोठे याने तत्काळ फरार झाला. यात त्याला मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. आरोपीला पळून जाण्यास मदत केली म्हणून त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.