नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय ग्रुप्सची यापुढे फेसबुकवर शिफारस केली जाणार नसल्याची मोठी घोषणा फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केली आहे. दरम्यान, कंपनीने असा निर्णय अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी देखील घेतला होता.
मार्क झुकरबर्ग म्हणाले, आमच्या कम्युनिटीकडून आम्ही फीडबॅक घेतला आहे. जो ऐकल्यानंतर असे दिसून आले आहे की, लोक आता पॉलिटिकल कंटेट पाहणे पसंत करत नसल्यामुळे आपल्या सेवेत बदल करण्याचा प्लॅन आम्ही करत आहोत.
अमेरिकेत निवडणुकीवेळी उचलले होते हे पाऊल
गेल्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन युजर्संना या ग्रुप्सना शिफारस करण्यापासून रोखण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. याशिवाय, कंपनी आता आपल्या न्यूज फीडमध्ये युजर्सद्वारे पाहिले जाणारे राजकीय कंटेट कमी करण्याचा प्लॅन करत असल्याचे मार्क झुकरबर्ग म्हणाले आहेत.
नफ्यात झाली वाढ
२०२० च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढला आहे. कोरोना संकट काळात लोक घरातच असल्यामुळे फेसबुक युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर डिजिटल जाहिरातींमधून मिळणारा महसूलही वाढला आहे. फॅक्टसॅटने केलेल्या सर्वेक्षणात विश्लेषकांनी असे म्हटले आहे की, फेसबुकने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ११.२२ अब्ज डॉलर नफा कमावला, मागील वर्षाच्या कालावधीपेक्षा जो ५३ टक्के जास्त आहे. जर आपण या कालावधीत कंपनीच्या उत्पन्नाबद्दल पाहिले तर ते २२ टक्क्यांनी वाढून सुमारे २८.०७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय, फेसबुकचा मासिक युजर्स बेस १२ टक्क्यांनी वाढून सुमारे २.८ अब्ज झाला आहे. फेसबुकमध्ये २०२०च्या शेवटपर्यंत ५८, ६०४ कर्मचारी होते.