शेवगावकरांचा संतप्त सवाल
शेवगाव नगरपरिषदेचा अजब कारभार
शेवगाव : भल्या मोठ्या उघड्या गटारीत वासरू पडल्याची घटना परवा वॉर्ड क्रमांक 8 मधील खाटीक गल्ली येथे घडली. मात्र, बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने वासराचे प्राण वाचविले. या घटनेमुळे स्थानिक नागरिक संतापले असून या गटारींचा प्रश्न नगरपरिषद कधी सोडविणार; की एखाद्या व्यक्ती पडून जीव जाईपर्यंत या गटारींना आणखी पोसणार, असा थेट सवाल केला आहे.
पैठण रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याच्या मागील बाजूस खाटीक गल्लीतील बुद्ध विहारा शेजारीच ही भली मोठी धोकादायक उघडी गटार आहे. या गटारीत एक वासरू पडून मेल्यात अडकले. बघता बघता ही वार्ता परिसरात पसरली. हे समजताच वंचीत बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष विशाल इंगळे सहकारी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहचुन वासराला वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू केले. मोठ्या मेहनतीने आणि बराच वेळ प्रयत्न करून त्यांनी या वासराला अखेर बाहेर काढत त्याचे प्राण वाचविले. या बाबत स्थानिक नागरिकांनी संबंधिताचे आभार मानले.
प्रभाग क्रमांक ८ मधील या अतिशय जिवघेण्या गटारी बाबत प्रभागातील नागरिकांनी शेवगांव नगरपरिषदाकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, या प्रश्नाकडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कायम डोळेझाक करतात, असा आरोप येथील नागरिकांचा आहे.
एखाद्यावेळी लहान मुले, वृद्ध आदि एखादी व्यक्तीच या गटारी मध्ये पडल्यास, जीव गमावल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे.
'आंधळ दळतय अन कुत्र पिठ खातय'
'आंधळ दळतय अन कुत्र पिठ खातय', अशीच काहीशी अवस्था सध्या नगरपरिषद प्रशासनाची झाली आहे. शहरात दहा-बारा दिवसाला होणार पाणी पुरवठा, खड्डेमय रस्ते, उघड्या-जीवघेण्या गटारी, खंडित वीज आदी पायाभूत समस्या 'आ वासून' उभ्या आहेत मात्र याची नगरपरिषदेला तमा न फिकीर. मग या समस्या सोडवणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातोय. शेवंगावकरांनी फोडलेला टाहो मात्र बहिरेपणाचं सोंग घेतलेल्या प्रशासनास ऐकू जायला तयार नाही, अशी वेधक प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्यारेलाल शेख यांनी 'एमबीपी लाईव्ह 24'शी बोलताना व्यक्त केली.
...तर तीव्र आंदोलन छेडू
या गटारीत पडून लहान मुले, जेष्ठ, एखाद्या व्यक्तीचाही जीव जाऊ शकतो. या गटारी चे काम त्वरित न केल्यास तिव्र आंदोलन करू, असा इशारा येथील संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
तो बैल मात्र मेला
नगर रोडवरील उताराला असणाऱ्या शौकीन हॉटेल समोरील अशाच उघड्या जीवघेण्या गटारीत काही दिवसांपूर्वी एक बैल (कठळ्या) पडला होता. मात्र या बैलाला आपले प्राण गमवावा लागला. शहरात अनेक ठिकाणी अशा धोकादायक उघड्या गटारी आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी व अनारोग्य पसरत असून नागरिकांना धोका वाढतोय.
शहरात नागरिकांच्या जीवावर बेतणारा हा खेळखंडोबा चालू असताना नगरपरिषद प्रशासनाला मात्र त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही, असेच चित्र सध्या तरी दिसतेय. या समस्यांमध्ये बुडणाऱ्या शेवंगावकरांना बाहेर काढण्यासाठी कोणीच वाली नाही का, हा खरा यक्ष प्रश्न आहे.
'एमबीपी लाईव्ह 24' शी संपर्क साधा
आपल्या आजूबाजूला प्रशासनाने पोसलेल्या जीवघेण्या, गंभीर समस्या असतील तर त्वरित तुमचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या 'एमबीपी लाईव्ह 24' शी त्वरित संपर्क साधा. लेखी, फोटो आणि व्हिडीओ स्वरूपात थेट आमच्याकडे आपल्या समस्या मांडू शकता.