लखनऊ : उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार विरेंद्र सिंह मस्त याच्या विरोधात भाजपचेच आमदार सुरेंद्र सिंह मैदानात उतरल्याने चर्चेला उधाण आले आहे. विरेंद्र सिंह भूमाफिया असल्याचा आरोप करत सुरेंद्र सिंह आता विरेंद्र सिंह मस्त आणि बालियाचे जिल्हाधिकारी यांना चांगला विचार करता यावा यासाठी 101 तासांचा उपवास धरणार आहेत.
बालियामधील बैरियामधील आमदार सुरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत खासदार विरेंद्र सिंह मस्त हे भूमाफिया असल्याचा आरोप करत एकच राळ उडवून दिली. खासदारांनी त्यांचा मुलगा, भाऊ आणि भाच्याच्या नावावर बैरियामध्ये शिवपूर गावातील विजय बहादूर सिंह यांची 18 एकर जमीन फसवणूक करुन बळकावली होती. सुरेंद्र सिंह यांनी उपवासाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, भाजपा खासदार विरेंद्र सिंह यांनी आमदार सुरेंद्र सिंह यांचा समाचार घेत सर्व आरोप फेटाळले आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा खासदार माझी ओळख आहे. मात्र, मी शांत आहे याला माझी कमजोरी समजू नका, असा इशाराही विरेंद्र सिंह यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून मात्र या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.