पूर्वीचे नेते
राष्ट्रपुरुष, महात्मा होते
त्यांच्याकडे विचार होता
ध्येय होती. पक्षाप्रती आदर होता. निष्ठा होती...
लोकसेवेचा ध्यास होता..
साधी राहणी होतीच.. पण विचारही आदर्शवादी होते..
हल्लीच्या अनेक तरुणाईला हे माहीतही नसेल..
कोणाचं जीवन काय होत, अन् कोणी देशासाठी किती त्याग केला...
हे जाणुन घ्यायची देखील इच्छा नसेल अलीकडे..
सोशल मीडियातून संस्कार घेणारे आपण,
खर काय अन् खोटं काय?
हे शोधण्याच्या भानगडीत पडत नाही आपण..
जो सूना है वह लेके चलो बस...
सगळा देश या सोशल मीडियावर चालु आहे.
वाढदिवसाला हात जोडतानाचा फ्लेक्स लागला की
दुसऱ्या दिवशी झाला तो नेता..?
डायरेक्ट दुसरीतून आठवीत प्रवेश..
सगळ काही स्वतः भोवती फिरत रहायला हवं..
राजकारणातून गावचा विकास..
हे मानायचे दिवस केव्हाच गेले..
आता निवडणुकीत कीती गेले.. तर किती मिळवायचे?
बढके लगाव बढके मिलेगा.. हा फंडा झालाय..
लोकं ही लोकांच्या प्रॉब्लेममधे..
अहे कुणाला तरी इतका वेळ की कोणत्या प्रश्नावर बोंब करावी..
आहे ते चार पाच,बघतील ते...
जे लोकांचं होईल ते आपल होईल ही साध गणित मांडलं आहे साऱ्यांनी...
नेता आज हिरव्या पंचात तर उद्या भगव्या वेशात..
कसली व्याख्या अन् कसले आले संस्कार..
ज्याला त्याला आपल्या कारखान्याच, शिक्षण संस्थेच पडलंय..
काल बोंब मारणारा नेता आज तोंडात गुलकंद टाकून बोलतोय...
भाडोत्री टाळ्या चालुच असतात..
रात्र रात्र एका ध्यासापोटी आपल्या नेत्याची पोस्टर, पताका लावणारे कार्यकर्तेही हल्लीं दिसत नाहीत..
ना निष्ठा..ना दृष्टी.. ना विचार.. ना कर्तव्य..
कोणत्या घरात जन्माला आलाय याला महत्व..
दुसरा फारच जोशात काम करायला लागला की त्याची दांडी केव्हा गुल होइल याचाही पत्ता नाही..
जेवढी गाडी भारी तेवढा नेता महान..
आपल्या नेत्याकडे फोरच्युनर आहे की स्कोडा..
याची चर्चा महत्वाची...
मेरी झाशी नहीं दुंगी..
तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा..
गेले ते भारावलेले दिवस..
अन् ती माणसे..
पैसा कमवायचा..
सार्वजनिक हितासाठी असलेल्या संस्थेतून कुठं काही मिळतं का हे शोधायचं, खूप काही मिळवायचं हेचं सूत्र..
सगळ काही बिनधास्त चालू असत..
विचारी माणसे मतदानाला येत नाहीत..
मधली माणसे कुणी येतो का घेवून हे चाचपडत असतात..
अन्
ज्यांना विकास बिकासाशी काही देणं घेणं नसत ते अत्तर लावून पहिल्या रांगेत मतदानाला..
हे आपल्या लोकशाहीचं चित्र...
संस्कार देणारी माणसे...
सगळी पिढी आपल्यातून निघून गेलीय..
सांगणार कोणी राहिलं नाही..
लगाम सुटलेल्या घोड्यासारखी अवस्था झालीय...
ते उधळलेत..
अन्
आपण त्या उडालेल्या धुळीत रंगपंचमी खेळतोय...
- जयंत येलुलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)