मध्यप्रदेशमध्ये जाऊन दमदार कारवाई केल्याची कृष्ण प्रकाश यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत २४ पिस्तूल आणि ३८ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यापासून येथील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक बसविण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. येथे गुन्हेगारांकडून सर्रासपणे होणार्या शस्त्रांच्या वापरावर अंकुश बसावा म्हणून कृष्ण प्रकाश यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर खून, दरोडा, जबरी चोरी यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेल्या आरोपी रुपेश पाटील याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 4 पिस्तूल आणि 4 काडतुसासह अटक केली. त्याने हे पिस्तूल मध्यप्रदेश येथून आणल्याचे सांगितले. यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर भोसरी पोलिसांचे एक विशेष पथक मध्यप्रदेश येथे रवाना झाले.
यानंतर या विशेष पथकाने मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील वरल्यात उमर्टी गावातील जंगलात सापळा रचून पिस्तूलचा मुख्य डीलर रॉनी उर्फ बबलूसिंग बरनाला याला अटक केली. त्याच्याकडून एकूण 8 पिस्तूल आणि 20 जिवंत काडतूसे जप्त केली. यानंतर रॉनीचा मध्यप्रदेश येथील साथीदार कालू उर्फ सुशील मांगिलाल पावरा याला 2 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसासह अटक केली.
रॉनी आणि कालू यांनी पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात पिस्तूलचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले. यात एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली. या सर्वांवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तर काहींवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे.