रेखा जरे हत्याकांड
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड बाळ बोठेचा जामिन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज फेटाळला. दरम्यान, बोठे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्या हत्या प्रकरणात पाच आरोपींना दोन दिवसांत पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र हत्येचा मास्टरमाईंड बाळ बोठे याला पकड्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. बोठे अद्याप फरार आहे. या आधी बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली.
बोठेला शोधण्यासाठी स्टॅडिंग वॉरंट जारी करण्यात आले असून बोठेच्या मागावर राज्यातील पोलिस आहेत. तरीही पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी होत आहे. बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे पोलिसांसोर मोठे आव्हान आहे. आता बोठे सुप्रीम कोर्टात जातो की पोलिसांना शरण येतो याकडे सर्वाचे लक्ष आहे.