औरंगाबाद - शासनाने जाहीर केलेल्या सरपंच आरक्षणास आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकांवरील सुनावणी बुधवारी, 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याबाबतची माहिती ऍड. संदीप आंधळे यांनी दिली.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन त्यांचा निकालही नुकताच लागला. यानंतर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चे आरक्षण शासनाने जाहीर केले. मात्र, या बाबत आक्षेप घेत सरपंच आरक्षणास आव्हान देण्यासाठी राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूरहून याचिका खंडपीठात दाखल केल्या आहेत.
यावर आज सुनावणी झाली. यावेळी सर्व दाखल याचिकांची क्रमवारी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच पुढील सुनावणी बुधवारी होणार असल्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
सरपंच पदासाठी इच्छुक ग्रामपंचायत सदस्यांना आणि याचिकाकर्त्यांना बुधवारची वाट पहावी लागणार आहे. सुनावणी वेळी उच्च न्यायालय नेमका काय निर्णय देईल, याकडेच राजकीय क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागले आहे.