नाशिक : मोशी (पिंपरी-चिंचवड, पुणे) येथील 'ड्रीमव्हिजन फॉर यू ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड' या नेटवर्क मार्केटींग कंपनीने 'फसवणुकीचा डबल गेम' करून राज्यातील हजारो गुतवणूकदारांची मिळून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पहिल्या गुंतवणूकदारांची परतफेड केली नसतानाच याच ऑफिसमध्ये 'प्रॉपकार्ट मल्टिट्रेड इंडिया प्रायव्हेट लि मिटेड' नावाची दुसरी कंपनी सुरू करून नव्याने राज्यातील बेरोजगारांना गंडा घालण्यापर्यंत मजल गेल्याचे समजते. शहरातून दिवसा ढवळ्या कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पिंपरी-चिंचवडचे धडाकेबाज पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
कंपनीच्या मोशी येथील स्पाईन रोडवरील स्पाईनसिटी मॉल मध्ये आणि माऊली बिल्डींग मध्ये कंपनीची कार्यालये आहेत. येथूनच कंपनीची सर्व सूत्रे हलविली जातात.
दरम्यान, या कंपनीचे संस्थापक सिएमडी दाम्पत्य असणारे दिनेश भगवान कुरकुटे आणि दीपिका दिनेश कुरकुटेने या बंटी-बबली दाम्पत्याने व्हाईस प्रेसिडेंट नवनाथ मगर, आणि सिईओ अमितकुमार पोंदे यांनी मिळून फसवणुकीचा डबलगेम रचल्याचे फसवणूक झालेल्या गुतवणूकदारांनी दिलेली माहिती आणि पुराव्यावरून समोर येत आहे.
राज्यातील शेतकरी, कामगार यांना 24 महिने 19500 रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून कंपनीच्या वेगवेगळ्या स्कीम मध्ये 2 लाख 2 हजार 500 रुपया प्रमाणे लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच इतरांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले. या बरोबरच राज्यातील सुमारे 2 ते 3 हजार लोकांकडून प्रत्येकी 2 लाख 2 हजार पाचशे रुपये तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून घेतले. प्रत्यक्षात मात्र पैसे परत दिले नाहीत. अचानक कंपनी बंद करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
मात्र हे आश्वासन कंपनीने पूर्ण न केल्याने गुतवणूकदारांनी कंपनीकडे चौकशी केली असता कंपनी तोट्यात असून परतावा देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुतवणूकदारांच्या लक्षात आले. आता कंपनी परताव्याच्या पैशांच्या बदल्यात कंपनीने खरेदी केलेली जमीन बळजबरीने गुंतवणूकदारांच्या गळ्यात मारण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण...
संचालक कुरकुटे दाम्पत्याने 16 नोव्हेंबर 2016 रोजी ड्रीमव्हिजन फॉर यू ट्रेड प्रा.लि. या नेटवर्क मार्केटिंग कंपनीची स्थापना केली. कुठल्याही प्रकारे कायदेशिर नसलेला 2 लाख भरा आणि तिपटीने परतावा मिळवा असा फसवा मनिसर्क्युलेशन प्लॅन काढून या बंटी-बबली जोडीने महाराष्ट्रासह जवळच्या गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आदी राज्यांमधील हजारो गुतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. तसेच राज्यातील पुणे, मुबई, नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, अकोला, सोलापूर आदी जिल्ह्यातील हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.
पुण्यातील प्रकरण कंपनीने दाबले
ड्रीमव्हिजन कडून फसवणूक झालेल्या पुण्यातील काही गुंतवणूकदारांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात कंपनी विरोधात तक्रार अर्ज दिला असल्याचे समजते. मात्र येथे पोलिसांना हाताशी धरून कंपनीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही गुंतवणूकदारांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
नागपूर पोलिसात तक्रार दाखल
दरम्यान, ड्रीमव्हिजन कंपनीच्या फसवणुकी विरोधात नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयातही तेथील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांशी साटेलोटे करून प्रकरण दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न कंपनीकडून सुरू असल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून करण्यात आला आहे.
नेटवर्क मार्केटिंग फसवणुकीचे पिंपरी-चिंचवड मुख्य केंद्र
बहुतेक फसव्या मार्केटिंग कंपन्यांचे पिंपरी-चिंचवड हेच मुख्य केंद्र बनले आहे. राज्यातील गरजू बेरोजगारांना आमिष दाखवून त्यांना सबशेल लुटण्याचे काम येथे सुरू आहे. येथील मोशी, रावेर परिसरासह अनेक भागात या नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांनी आपली दुकाने मांडली आहेत. या केंद्रावर पोलिसांकडून कारवाई होणे आवश्यक आहे. आधीच कोरोनाने होरपळलेल्या बेरोजगारांना गळाला लावण्याचे काम या कंपन्या करत आहेत.
कृष्ण प्रकाश साहेब न्याय द्या'
पिंपरी-चिंचवड चे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात. ते आपल्याला निश्चित न्याय देतील असा कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या राज्यातील शेतकरी, कामगार, बेरोजगार यांना विश्वास आहे.
कायदा झुगारून करतायेत लूट
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातुन अनेक फसव्या नेटवर्क मार्केटिंग कंपन्या आपला धंदा चालवत आहेत. या कंपन्या केंद्र आणि राज्याने परिपत्रक काढून मांडलेल्या गाईडलाईनला फाट्यावर मारून मनमानी कारभार करत आहेत. कायद्याला न जुमानता बिनधास्त सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांना नेमके कुणाचे अभय आहे याचा शोध घेण्याची गरज आहे.
------------------------
'ड्रीमव्हिजन' कंपनीने केलेल्या फसवणुकीचा भांडाफोड
पुढील भागात वाचा ...
भाग-2
मंचरच्या 'बंटी-बबली' चा फसवणुकीचा डबल गेम
-----------------
भाग-3
*परताव्याच्या कोकणातील जागेतूनही कंपनी कमवतेय माया*
--------------
भाग-4
पुण्यातील अनेक फसव्या नेटवर्क ऑनलाइन कंपन्याची तरुणाईला भुरळ
----------------
भाग- 5
कायद्याचे असे वाजवले तीनतेरा
-------------