मुंबई: मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने याबाबत मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. हा आव्हान अर्ज आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे.
भाजपचे नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मुबई उंचच न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनमानी निर्णय घेत आपला विरोधी पक्षनेतापदाचा दावा फेटाळून लावला, असा दावा याद्वारे करण्यात आला होता. त्यात न्यायालयाच्या आदेशानुसार विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेसचे रवी राजा यांनाही नंतर याचिकादारानी प्रतिवादी केले होते. अखेरीस सुनावणीअंती शिंदे यांची याचिका फेटाळून लावली होती. त्याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. मात्र, त्यावरील सुनावणीअंती आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठाने शिंदे यांचे अपिल फेटाळून लावले.
शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजपने सत्ताधारी शिवसेनेची साथ सोडली होती. त्यानंतर संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला होता. या पदासाठी व पालिकेतील गटनेतेपदासाठी भाजपकडून नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची शिफारस करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसकडे आधीपासूनच विरोधी पक्षनेतेपद असल्याचे नमूद करत व पालिकेच्या नियमांच्या आधारावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदावरील दावा फेटाळून लावला होता. महापौरांच्या या निर्णयाला भाजपकडून शिंदे यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. ही याचिका उंचच न्यायालयाने फेटाळून लावली होती.
दरम्यान, हायकोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. मुंबई पालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार असून त्याआधी भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आता पालिकेतलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहणार हेसुद्धा आज स्पष्ट झाले आहे.
भाजपचा दावा
२०१७ मधील महापालिका निवडणुकीत भाजप ८३ नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. शिवसेनेचे ८४, काँग्रेसचे ३१ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ नगरसेवक होते. त्यावेळी विरोधी पक्षनेत्याचे पद स्वीकारण्याऐवजी तटस्थ राहण्याची भूमिका भाजपने स्वीकारली होती. त्यामुळे ते पद तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसकडे गेले. मात्र, २८ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबई भाजपतर्फे मंगलप्रभात लोढा यांनी महापौरांना विनंतीपत्र देऊन प्रभाकर शिंदे यांची विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करण्याची विनंती केली होती. महापौरांनी मुंबई महापालिका कायद्यान्वये संख्याबळाचा विचार करून विनंती मान्य करायला हवी होती. मात्र, त्यांनी कायद्याचा विचार न करता ५ मार्च २०२० रोजी मनमानी निर्णय घेत विनंती फेटाळली, असा दावा भाजपने केला होता.