मुंबई : त्या बँका कोणत्या याची उत्सुकता संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकाच्या खासगीकरणाची घोषणा झाल्यानंतर सर्वांना लागली आहे. सोमवारी प्रसार माध्यमांमध्ये संभाव्य चार बँकांचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने या बँकांमधील ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, या वृत्तांमध्ये तथ्य नाही, असे केंद्रातील वरिष्ठ सूत्रांनी म्हटले आहे. अद्याप सरकारने बँकांची निवड केली नसल्याने याबाबत सस्पेन्स कायम आहे.
केंद्र सरकारने चार मध्यम श्रेणीतील बँकांची निवड खासगीकरणासाठी केली आहे. ज्यात बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया , इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या चार बँकांचा समावेश आहे, अशा प्रकारचे वृत्त माध्यमांमध्ये सध्या चर्चेचा विषय बनले आहे. याबाबत केंद्र सरकारच्या वरिष्ठ पातळीवरील सूत्रांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. कोणत्या बँकांचे खासगीकरण करावे याची अद्याप निवड झालेली नाही, असे सूत्रांनी म्हटले आहे. तसेच खासगीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, असे या सूत्रांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर म्हणाले, की कोणत्या बँकांचे खासगीकरण करणार याबाबत केंद्र सरकारने कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रचे नाव घेणे खोडसाळपणाचे आहे. अशा वृत्तांमुळे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे तुळजापूरकर यांनी सांगितले.
बँक ऑफ महाराष्ट्र सर्व वित्तीय निकषांवर चांगली कामगिरी करत आहे. ही सामान्यांची बँक असून नफ्यातील बँक आहे. अशा निराधार वृत्तांवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज असोसिएशनने केले आहे.
बँकाच्या शेअरमध्ये तेजी
खासगीकरण होणार या वृत्तानंतर आज मंगळवारी भांडवली बाजारात चारही बँकांच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर २० टक्क्यांनी वधारला. तर इंडियन ओव्हरसीज बँक १९ टक्के, बँक ऑफ इंडिया १५ टक्के आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये १५ टक्के वाढ झाली होती.