नवी दिल्ली : विनाकारण फोन करुन त्रास देणाऱ्या टेलिमार्केटिंगवाल्यांची आता खैर नाही. दूरसंचार ग्राहकांना विनाकारण फोन करुन त्रास देणाऱ्या व्यक्ती किंवा टेलिमार्केटिंग करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिले आहेत. डिजिटल व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह व्हावेत यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली.
'डू नॉट डिस्टर्ब' (डीएनडी) नोंदणीकृत ग्राहकांना SMS किंवा कॉल करणाऱ्या टेलिमार्केटर किंवा संबंधित टेलिकॉम कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी घेतला आहे. डीएनडी नोंदणीकृत ग्राहकांसाठी असलेले नियम आणि कार्यपद्धतीची पूर्तता करावी आणि कोणतेही उल्लंघन झाल्यास आर्थिक दंड आकारला जावा, असे निर्देश प्रसाद यांनी दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
तथापि, दूरसंचार संबंधित फसवणूकींच्या प्रकाराच्या चौकशीसाठी “डिजिटल इंटेलिजेंस युनिट” (डीआययू) नोडल एजन्सीसोबत समन्वय साधण्यासाठी स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दूरसंचार विभागाकडून परवाना व्यवस्थापन क्षेत्र पातळीवर फसवणूक व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूरसंचार संसाधनांचा गैरवापर करून होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी वेब, मोबाईल अप्लिकेशन आणि एसएमएस आधारित प्रणाली विकसित करण्यावरही विचार केला जातआहे.