छत्रपती शिवाजी महाराज जयंती : सरकारच्या नियमावलीवरून भाजप आक्रमक

मुंबई : राज्यभर १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर करून बंधने घातली आहेत. या वरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. भाजपने सरकारवर टीका केली आहे.

राज्य कोरोना संकटानंतर पूर्वपदावर येत असले तरीही राज्य सरकारकडून अद्याप काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदा साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून यासंबंधीची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. केशव उपाध्ये यांनी यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास निर्बंध घालणाऱ्या महाआघाडी सरकारने आपला खरा ‘रंग’ दाखवला आहे. महाविकास आघाडी सरकार हिंदू समाजाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानीला अटक करण्यास टाळाटाळ करते. शिवरायांचे नाव सत्ता टिकविण्यासाठी घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेने घालीन लोटांगणचा आणखी एक प्रयोग महाराष्ट्रात सादर केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून 'हिंदू समाज सडा हुवा है' म्हणणाऱ्या शर्जिल व एल्गार परिषदेसाठी पायघड्या, पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करायला बंधने महाविकास आघाडी सरकार घालते, अशा शब्दांमध्ये  उपाध्ये यांनी आज टीका केली आहे.

शिवसेनेने सत्तेसाठी अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादी पुढे लोटांगण घातले आहे. आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने घालीन लोटांगण, वंदीन चरणचा नवा प्रयोग सादर केला असल्याची टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

सरकार दारूची दुकाने, नाईटलाइफ, बार सुरु करण्यास परवानगी देताना गर्दीचा विचार करीत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात कोरोनाच्या नावाखाली अनेक अडचणी आणल्या जात आहेत. पण धार्मिक भावना भडकवणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी देताना आघाडी सरकार मागेपुढे पाहत नाही. पण राज्यकर्त्यांच्या डोळ्यात शिवजयंती का खुपते? असा सवालही उपाध्ये यांनी पत्रकात केला आहे.

राज्य सरकारची शिवजयंती संदर्भातील नियमावली

👉 साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा.

👉 गड-किल्ल्यांवर जाऊन यंदा शिवजयंती साजरी करु नये.

👉 सांस्कृतिक कार्यक्रमांचे सार्वजनिक ठिकाणी आयोजन करु नये.

👉 यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांवर बंदी.

👉 महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे.

👉 शिवजयंती फक्त १० जणांच्या उपस्थितीत साजरी करावी.

👉 आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !