अहमदनगरसाठी नगरविकास मंत्र्याच्या 'या' मोठ्या घोषणा

अहमदनगर : अहमदनगरमधील बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासाठी 5 कोटी, तर 1 हजार आसनी नाट्यगृहासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याची घोषणा राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 


अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला अहमदनगर महापालिकेअंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 5 नगर पंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी आणि विकास यंत्रणा कामांचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले, कोरोनामुळे अडचणी वाढल्या असल्या तरी विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. मात्र विकास कामे करताना प्राधान्यक्रम ठरवून कामे करावी लागणार आहेत. अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, त्याचवेळी महापालिका, नगरपरिषदांनी स्वतःचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी हे विकासाची दोन रथे आहेत. विकासामध्ये कोणतेही राजकीय अभिनिवेश न बाळगता काम करणे गरजेचे आहे.

फिल्मसिटी, थीम पार्क उभारणार

अहमदनगर शहराजवळील सातशे एकर जमिनीवर फिल्मसिटी, थीम पार्क प्रमाणे मोठा भव्य दिव्य प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विकासाबाबतची प्रलंबित कामे युध्दपातळीवर पू्र्ण करावीत. अहमदनगर जिल्ह्याच्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही,” अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. अनधिकृत बांधकामे खपवून घेणार नाही, पाणी पुरवठा व भूमिगत गटार योजना प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील याकडे लक्ष देण्याचे निर्देशही दिले.


नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाच्या घोषणा

-अहमदनगरमधील बाळासाहेब ठाकरे दवाखान्यासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा.

- उड्डाणपुलाला अनिलभैया राठोड यांचं नाव देण्याबाबत महासभेने प्रस्ताव मंजूर करुन राज्य सरकारकडे पाठवावा. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार.

-छत्रपती संभाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभारण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश.

-एक हजार आसनी नाट्यगृहासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असल्याची घोषणा.

-अहमदनगर जिल्ह्यातील विविध नगरसेवक, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी, आमदार यांनी विकासकामांबाबत मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेणार.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !