अहमदनगर - महापालिका महापौर पदाची मुदत संपत आलेली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी या पदावर हक्क सांगण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवाय या पदावर बसणारी व्यक्ती प्रत्येक वेळी अनपेक्षित असल्याचे दिसून आले आहे.
किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल, असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
शहर जिल्हा काँग्रेची संघटनात्मक आढावा बैठक थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. थोरात म्हणाले, संघटनात्मक फेरबदल केल्याने शहरामध्ये काँग्रेस जोमाने काम करत आहे. मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.
किरण काळे यांनी महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादी अभद्र युतीवर टीका केली. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना शहरात मात्र चुकीच्या पद्धतीने मित्रपक्ष वागत आहे. त्यामुळे काँग्रेस शहरामध्ये विरोधी बाकावर असून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहे, असे सांगितले.