अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. दीपाली यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरुवारी आत्महत्या केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. दीपाली यांच्या सुसाइड नोटमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
परंतु वरीष्ठ अधिकारी यांचे जवळपास फिरणारे, पत्रकारांशी संबंध असणारे आणि सतत बेशिस्तपणा अंगात भरून, इतरांचे चुगल्या करत काहीही काम न करता फक्त मलिदा शोधणारेही अधिकारी अंमलदार हाताचे बोटावर मोजण्या इतपत असतात.
त्यामुळे इतर ९५ टक्के लोकांना नकारात्मक मानसिकता सहन करावी लागते. मग नैराश्य येते.. बर्याच शासकीय विभागात कमी अधिक असेच चालते. तसेच ज्याठिकाणी अन्याय अत्याचार याचे कळस होतो, तेथे 'दीपाली' नावाची पणती स्वतःचे आयुष्याला आग लावते...
खरंतर तिची धमक मोठी असते.. ती सतत समजाला प्रेरणा असते. परंतु आपण कशासाठी सहन करायचे हे सर्व ? याचे उत्तर मिळत नाही. मग ती स्वतः विझते..
आपण काम करत असलेले ठिकाणी वातावरण पारदर्शक, सुसंवादाचे आणि निःपक्षपातीपणाचे असावे. आजपर्यंतचे नोकरीतील अनुभवातून व भोवतालचे जगाचे अभ्यासातून मला भविष्यातील आत्महत्या रोखण्यासाठी काय करावे लागेल, किंवा आपण वागण्यात, आचरणात कसे बदल करावे लागतील, याकरिता आचारसंहिता (code of conduct) तयार केली आहे.
'हे' करावे..
आपले कामकाज करताना निःपक्ष पाती व कायद्याला अभिप्रेत असणारे नियमात करावे. ते करत असताना ऐक empathy ठेवून करावे.
आपल्याला हवी ती पोस्ट, जागा पाहिजे असेल, तर त्यासाठी लागणारी पात्रता व बुध्दिमत्ता प्राप्त करावी.
आपले कामाचे ठिकाणचे सोबतचे सहकारी यांची मानसिकता समजून घ्यावी.
प्रत्येक व्यक्ती मध्ये असलेले सकारात्मक आणि चांगले गुण त्याला वेळोवेळी सांगून त्यामध्ये काम करणेची ऊर्जा निर्माण होईल, असे वर्तणूक ठेवावी.
जीवनात पैसा लागतो, हे जरी सत्य असेल तरी पैसे नसणारी व्यक्ती सुद्धा सुखात राहतात, अशी अगणित उदाहरणे आहेत, याकडे पाहावे. आहे त्यात समाधानी राहणे अवगत करावे.
'हे' नकोच
आपली पात्रता नसताना राजकीय पुढारी, वरिष्ठ अधिकारी यांची चापलुस्की, आर्थिक तडजोडी करून ते पद, पोस्टिंग, जागा मिळवू नये.
कोणत्याही प्रकरणात अर्धवट माहितीवर एखाद्याची पराकोटीची बदनामी करू नये. पत्रकार, टिव्ही रिपोर्टर यांना दारू पाजुन, पैसे देवून एखाद्याला आयुष्यातून उठवणेपर्यंत प्लॅनिंग करू नये.
आयुष्यात एखाद्याला कोणत्याही बाबतीत नकार देताना तो का नाकारला गेला, याबाबत त्याला समजेल असे कारण सांगून नाकारले जावे.
एखाद्याकडून चुकीची गोष्ट घडली असेल, तर त्याला विहित पद्धतीने सामोरे जाणेस सांगावे. त्याचेबाबत आपण त्याला संपवणेकरिता प्रयोग करू नये.
गुणवत्ता असेल तर एखाद्याला त्याचे जात, धर्म, प्रांत, याबाबत भेद करून व आर्थिक तडजोडी करून, सुखासीन बाबीचे प्रलोभनमधून त्याला डावलले जात नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.
वरील गोष्टी आचरणात आणल्या तर आपण एखाद्याचा आत्महत्येस कारणीभूत ठरणार नाहीच. उलट कित्येकांचे आयुष्य सावरणेचा मार्ग बनू असे मला वाटते. दीपाली ताई, आपणास भावपूर्ण आदरांजली.
- विनोद चव्हाण
(सहायक पोलिस निरीक्षक,
महाराष्ट्र पोलिस दल)