शाब्बास ! शिंगवे नाईक मंदिरातील चोरी उघडकीस, तीन आरोपी अटक, १.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त


अहिल्यानगर –शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदीर, भैरवनाथ मंदीर व सावता महाराज मंदीरामध्ये झालेल्या चोरीचा छडा (Crime Detection) लावत पोलिसांनी तीन सराईत आरोपींना अटक करून तब्बल १.०३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अवघ्या तीन दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी चोरीस गेलेले दागिने व देवमूर्तीवरील मुकुट परत मिळवून मंदिर व्यवस्थापनाकडे सुपूर्द केले. दि. १५ सप्टेंबर रोजी विवेक लक्ष्मण शिंदे (रा. शिंगवे नाईक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दि. १४ ते १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी श्रीराम मंदीर, भैरवनाथ मंदीर व सावता महाराज मंदीर यांची कुलपे तोडून सोन्याचे व चांदीचे दागिने, मुकुट, पंचधातूचे मुकुट, रोख ५० हजार रुपये असा तब्बल १.३३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

याशिवाय सावता महाराज मंदिरात तोडफोड तर भैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरीला गेली होती. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याचा तातडीने तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी किशोर तुकाराम बर्डे (वय ३०, रा. वरंवडी, ता. राहुरी) यास मुळा डॅम परिसरातून अटक करण्यात आली.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याचे साथीदार सागर गणपत बर्डे (वय ३२, रा. मुळानगर, ता. राहुरी) व संजय बबन बर्डे (वय ३२, रा. मुळानगर, मुळा डॅम) असल्याचे उघड केले. त्यानंतर राहुरी येथून या दोघांनाही अटक करण्यात आली.

तिघांकडून देवाचे सोन्याचे मणी, चांदीचे मुकुट व मोबाईल असा एकूण १.०३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तो पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते श्रीराम मंदिर व्यवस्थापनाकडे परत करण्यात आला.

आरोपी किशोर तुकाराम बर्डे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही चोरी, दरोडा व फसवणुकीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजते. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक मनोज मोंढे, सहायक फौजदार राकेश खेडकर, हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, राजु सुद्रीक, सचिन आडबल, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव, जयशिंग शिंदे, सुरज देशमुख, हरदास व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !