नाशकात संघटन-यज्ञ ! शहीद भगतसिंगांच्या उर्जेने गृहविभाग कर्मचारी संघटनेने झटकली मरगळ

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

नाशिक - मरगळ झटकून नव्या जोमाने उभ्या राहिलेल्या महाराष्ट्र राज्य, गृहविभाग, कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने नाशिक येथे दोन दिवसीय 'संघटन-यज्ञ' आयोजित करून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जणू उर्जेचा महासागरच निर्माण केला आहे. नागरी सेवा प्रबोधिनीच्या शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या ऐतिहासिक प्रशिक्षण शिबिराने संघटनेच्या भविष्यातील झंझावाती वाटचालीची नांदी केली असून, "आता थांबणे नाही," असाच निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. 


गेल्या वर्षी तुळजापूर येथे झालेल्या अधिवेशनात संघटनेची पुनर्रचना झाल्यानंतर, राज्यभरात त्रिस्तरीय रचनेनुसार तब्बल ८० पोलीस कार्यालयांमध्ये आणि आठ परिक्षेत्रांमध्ये कार्यकारीणी स्थापन करून संघटनेने आपली प्रशासकीय पकड मजबूत केली होती. याच मजबूत पायावर आता विचारांचा आणि प्रेरणांचा कळस चढवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी ९० तर दुसऱ्या दिवशी ७२ पदाधिकाऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने शिबिराचा उद्देश सफल झाल्याची पावती दिली.

ज्ञानाचा जागर आणि व्यक्तिमत्वाला पैलू ! शहीद भगतसिंगांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन होताच, संघटक श्री बळीराम महाले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकेतून शिबिराची उद्दिष्ट्ये आणि महत्त्व स्पष्ट केले. यानंतर प्रसिद्ध मोटीव्हेशनल ट्रेनर श्री अभय बाग यांच्या 'व्यक्तिमत्व विकास' या ऊर्जादायी व्याख्यानाने खऱ्या अर्थाने ज्ञानाचा जागर सुरू झाला.

त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी श्री प्रफुल्ल झेंडे, श्री अनिल पाटील, श्री गणपत गोरे यांनी संघटन कौशल्य, कार्यालयीन कामाचा ताळमेळ आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या यावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. संघटनेची घटनात्मकता, आर्थिक शिस्त आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर यांसारख्या विषयांवरही तज्ज्ञांनी प्रकाश टाकला.

शांतीत धरू क्रांतीची कास : गणेश देशमुख - शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले ते संघटनेचे अध्यक्ष श्री गणेश देशमुख यांचे 'शहीद भगतसिंग एक आदर्श' या विषयावरील दोन तास चाललेले प्रभावी व्याख्यान. "भगतसिंग केवळ स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत, तर ते एक महान संघटक होते. त्यांचा त्याग, समर्पण आणि विचार आजही संघटनात्मक कार्यासाठी दीपस्तंभासारखे आहेत," असे सांगत देशमुख यांनी उपस्थितांच्या मनात शहीद भगतसिंग यांचे दुसरे रूप समोर मांडत शांतीत देखील क्रांतीची कास कशी धरायची या माध्यमातून समर्पणाची ज्योत पेटवली.

दुसऱ्या दिवशी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस, आदरणीय श्री विश्वास काटकर साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. श्री काटकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून मध्यवर्ती संघटनेचा गौरवशाली इतिहास, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी आणि पेन्शनसाठी दिलेला लढा उलगडला. ते म्हणाले, "संघटना हे केवळ मागण्यांचे व्यासपीठ नाही, तर ते कर्मचाऱ्यांचे कुटुंब आहे. या कुटुंबासाठी प्रत्येकाने झोकून देऊन काम केले पाहिजे." त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित अक्षरशः भारावून गेले.

गुणवंतांचा गौरव आणि भविष्याचा निर्धार! - यावेळी पोलीस विभागाच्या लिपिकवर्गीय परीक्षांमध्ये राज्यस्तरावर यश मिळवलेल्या गुणवंतांचा श्री विश्वास काटकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा पाहून उपस्थित कर्मचाऱ्यांची छाती अभिमानाने फुलून आली होती. सर्व सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रांचे वाटप करून संघटनेने प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकृत ओळख आणि सन्मान दिला.

शिबिर नव्हे ऊर्जाकेंद्र : एकंदरीत, हे शिबिर केवळ एक प्रशिक्षण न राहता, ते संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जाकेंद्र ठरले. सूत्रसंचालक श्री प्रफुल्ल झेंडे आणि आभार प्रदर्शन करणाऱ्या श्रीमती वंदना साळवे यांच्यासह प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या नियोजनातून या शिबिराने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या 'संघटन-यज्ञा'तून मिळालेली ऊर्जा आणि दिशा घेऊन गृहविभागातील कर्मचारी संघटना आपल्या हक्कांसाठी अधिक ताकदीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने लढा देईल, हे निश्चित.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !