मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, निर्बंध घालतोय, पण आता पर्याय नाही. लॉकडाऊन म्हणत नाही, पण काही निर्बंध तसेच आहेत. साखळी तुटायला हवी. उद्या 14 एप्रिलपासून रात्री 8 पासून निर्बंध लागू होतील.
हेही वाचा - राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध, दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५,४७६ कोटींचे पॅकेज
मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार, महाराष्ट्रात उद्या संध्याकाळी 8 वाजेपासून कलम 144 लागू केली आहे. हे निर्बंध पुढील 15 दिवस राहणार आहे. यात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
पुढील 15 दिवस राज्यातील सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरु राहतील. तसेच, बस, लोकल सेवांसह अत्यावश्यक सेवांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहे. त्यात बदल होणार नाही.
रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, जनावरांचे दवाखाने, बस, ऑटो, राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात ऑक्सीजनची कमतरता
राज्यात ऑक्सीजनची कमतरता आहे. रस्त्याने ऑक्सिजन आणणे कठीण आहे. हवाई मार्गे ऑक्सिजन मिळत असेल तर ती परवानगी देऊन एअरफोर्सने ऑक्सिजन पाठवा, अशी केंद्राला विनंती केली आहे. ऑक्सिजन, औषधांची कमतरता जाणवतेय, असे ठाकरे म्हणाले.
येत्या काळात आरोग्य व्यवस्था पुन्हा वाढवतोय. जिथे आवश्यक तिथे व्यवस्था वाढवणार आहोत. आरोग्य व्यवस्था वाढवतोय पण हे एकतर्फी आहे. कारण आरोग्य व्यवस्था वाढले तरी डॉक्टर हवेत. जे नवे उत्तीर्ण झालेले डॉक्टर आहेत, त्यांना आवाहन करतोय, निवृत्त डॉक्टर, परिचारिकांना महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले.