शेवगाव - येथील नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या शेवगाव शाखेतील कथित सोने तारण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. याची सखोल चौकशी करून सर्व सामान्य शेतकरी व शेत मजुरांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार दि. १२ एप्रिल पासून शेवगाव शाखेच्या कार्यालयासमोर फसवणूक झालेले व्यक्तींसह बेमुदत उपोषण करणार असल्याची महिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी दिली.
थकबाकीदारांची यादी केली प्रसिद्धदरम्यान, नगर जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकांमधून नगर अर्बन बँकेने १ एप्रिल रोजी बँकेच्या शेवगाव शाखेतील सोने तारण कर्जदार व थकबाकीदारांची यादी नावसाहित प्रसिद्ध केली असून कर्जाची रक्कम व्याजासह १४ एप्रिल पर्यंत भरावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावली आहे.
वास्तविक पाहता सर्व सोने तारण कर्जदार व थकबाकीदार हे सर्वसामान्य, गरीब, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील आहेत. त्यांनी सोने तारण कर्ज प्रकारणाबद्दल नगर अर्बन बँक कार्यालयाशी संपर्क साधून शेवगाव शाखेतील गोल्ड व्हॅल्यूअर कडून आपली फसवणूक झाली असल्याचे वारंवार लेखी स्वरूपात कळविले आहे.
परंतु नगर अर्बन बँक प्रशासनाने या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. किंवा चौकशी देखील केली नाही उलट कुठलीही चौकशी न करताच संबंधित व्यक्तींना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे संबंधित थकीत कर्जदार हवालदिल झाले असून त्यातील एका व्यक्तीने मागील महिन्यात आत्महत्या केली आहे. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते.
फसवणूक करणारांचे रॅकेट
फसवणूक करणारांचे रॅकेट
या सर्व थकबाकीदारांची फसवणूक करणाऱ्या शेवगाव शाखेतील अधिकारी, कर्मचारी व गोल्ड व्हॅल्यूअर यांचे एक रॅकेट आहे. या कर्जदार थकबाकीदारांना विश्वासात घेऊन या रॅकेटने पद्धतशीरपणे त्यांची फसवणूक केली आहे.
त्यामुळे या थकीत सोने तारण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. बँकेच्या नियमानुसार एका व्यक्तीला किती सोने तारण पावत्या करता येतात, परस्पर नूतनीकरण करता येते काय ? सगळ्या सोने तारण च्या वस्तु एक सारख्याच कशा ? (ब्रासलेट, बांगडी) असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
सखोल चौकशी करा
सखोल चौकशी करा
अन्यथा बँक प्रशासनाने चौकशी न करताच सरसकट कारवाई केल्यास थकीत कर्जदारांना व ज्यांची सोने तारण प्रकरणात फसवणूक झाली आहे, अशा सर्व थकबाकीदारांना आत्महत्येशिवाय पर्यायच उरणार नाही.
त्यामुळे या प्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करूनच पुढील कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. १२ एप्रिल पासून कोरोना प्रतिबंधक सर्व नियम व अटी पाळून थकीत कर्जदार नगर अर्बन बँकेच्या शेवगाव कार्यालयासमोर बेमुदत प्राणांतिक उपोषणास बसणार आहेत. याची गंभीरपणे नोंद घ्यावी अशी मागणी नगर अर्बन बँक प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर यांच्या सह्या
निवेदनावर यांच्या सह्या
याबाबत चे निवेदन नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या प्रशासकांना सोमवारी देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, तालुका संघटक शेख सलीम जिलानी तसेच फसवणूक झालेले थकबाकीदार सचिन महाजन, अशोक लोढे, गणेश भोंडे, बालाजी महाजन, अनिल निकम, संतोष झिंजे, शेषराव नवले, मच्छीन्द्र निकम, कृष्णा महाजन आदी यावेळी उपस्थित होते.
प्रत माहितीस्तव सादर
या निवेदनाच्या प्रति माहितीसाठी मुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक व शाखा व्यवस्थापक यांना पाठविण्यात आल्या आहेत.