'हीच' ती वेळ आहे तुमचं 'नेतृत्व' आणि 'आधारस्तंभ' सिद्ध करण्याची..

अहमदनगर हा जिल्हा संपूर्ण देशात सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. तसंच या जिल्ह्याचं नाव जरी सरळ (काना, मात्रा, वेलांटी नसलेलं) असलं तरी इथली लोकं आणि त्यांचे स्वभात तितके सरळ नाहीत, असं म्हटलं जात. त्याला कारणही तसंच आहे. देशाचं राजकारण हादरवुन सोडण्याची 'ताकद' या जिल्ह्यात आहे. तेवढी 'धमक' या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये आहे, आणि जनतेलाही त्याचा 'गर्व' आहे.

पण सध्याची परिस्थिती काहीशी विपरित झालीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड थैमान घातलंय. कुणालाही कल्पना नसेल इतक्या वेगाने कोरोनाचा संसर्ग फोफावत गेला. प्रशासनाच्या सूचना आणि नियमही लोकांनी पायदळी तुडवले अन कोरोनाला 'हलक्यात' घेतले, हेही त्याला तितकेच कारणीभूत आहे. 

'आता कोरोना गेला, कशाचा कोरोना ?' असं म्हणणाऱ्या लाेकांच्या आजूबाजूला कुटुंबंच्या कुटुंबं जेव्हा बाधित झाल्याचे आढळायला लागले, तेव्हा लोकांना त्याची भीषणता जाणवली. एकाच दिवशी ४० हून अधिक जणांवर अंत्यसंस्कार झाल्याचे दृश्श् नगरकरांसह संपूर्ण राज्याने पाहिले तेव्हा नगरकर खडबडून जागे झाले. 

अन उशिराने का होईना परिस्थिती हाताबाहेर गेली, तेव्हा कडक निर्बंध लादायला प्रशासनास भाग पडले. हे सगळं हाेईपर्यंत कोणते नेतृत्व कुठे कमी पडले, अन काय राजकारण झाले, हे जनता पाहतेच आहे. त्यावर आम्ही काही बोलायचीही गरज नाही. गेल्या पंधरवड्यात ऑक्सीजन बेड मिळेनासे झाले, रेमेडेसेवीर इंजेक्शनचा काळाबाजार व्हायला लागला. विमा असलेल्या रुग्णांना पायघड्या आणि सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड व्हायला लागली. 

हे चित्र विदारक होते. अशा परिस्थितीत जनतेने ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, त्यांच्याकडून अपेक्षा नाही ठेवायची तर कोणाकडून ठेवायची. कोरोना कसा वाढला, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं काय राजकारण चाललंय याचं सध्या कुणालाही घेणंदेणं नाही, असं लोकं आता म्हणायला लागले.

''तुमचं राजकारण घाला चुलीत', पण आधी आमची माणसं वाचवा, अशी आर्जवं करण्याची वेळ आता जनतेवर आली. तरीही सहकाराची पंढरी असलेल्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी जनतेच्या मदतीला धावून येईनात की लोकांचे फोन घेईनात. नगरमध्ये पुन्हा एकदा सामाजिक संघटनाच पोलिसांच्या मदतीला धावून आल्या. अन् आपली जबाबदारी सिद्ध केली.

या भीषण संकटात जिल्ह्यातील पोलिसांसोबत कित्येक डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक, लॅबचालक, वैद्यकीय सेवेतील तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रत्येक यंंत्रणेतील प्रत्येक घटक आणि 'फ्रंटलाईन' कोरोना योद्धे निकराची झुंज देत आहेत. किंबहुना यांच्यामुळेच आपल्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील सर्वाधिक आहे. या सगळ्यांना टीम MBP Live24 चा सलाम आहे.

पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी कोणतेही आर्थिक पाठबळ किंंवा भक्कम पार्श्वभूमी नसताना मैैत्रीची साद घालत पुढाकार घेतला अन कोविड केअर सेंटर सुरु केले. अख्ख्या जिल्ह्यात याची चर्चा झाली. निलेश लंके लोकांसाठी देवदूत झाले. इतर ठिकाणीही काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या परीने मदतही केली.

निलेश लंके यांच्या कोविड केअर सेंटरच्या पुुढाकाराचे व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. ते व्हायरल करताना लोकं स्थानिक लोकप्रतिनिधीनाही जाब विचारायला लागले. नंतर काही लोकप्रतिनिधी व स्थानिक नेते पुढे यायला लागले. पण अजूनही बहुतांश तालुक्यांमध्ये सहकारातील 'गब्बर' आणि 'मातब्बर' मदतीसाठी पुढेे यायला तयार नाहीत.

जिल्ह्यात स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आता कोविड केअर सेंटर सुरु करायला पुुढे येत आहेत. शेवगाव तालुक्यात शिक्षकांनी पुढाकार घेत अवघ्या चार दिवसांत ५ लाख रुपयांचा निधी गोळा केला. तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाज घडवणाऱ्या शिक्षकांनीच पुन्हा आदर्श उभा केला. यांनतर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आता मदतीसाठी सरसावत आहेत. उशिराने का होईना, पण हे होणं गरजेचं आहे.

आणि सध्या हीच ती वेळ आहे. कारण निवडणुकीला तुम्ही लोकांना काय आश्वासनं दिली, काय स्वप्न दाखवली, हे याच्याशी कुणाला काहीही घेणदंणं नाही. पण हीच परिस्थिती तुमच्याही कसोटीची आहे. लोकांसमोर खरंच तुमचं नेतृत्व कितपत 'भक्कम', 'खंबीर', 'आधारस्तंभ', 'चोवीस तास तुमच्यासाठीच', 'तुमचाच सेवक', आहे का? हे सिद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे. 

या माध्यमातून आमचेही सर्व लोकप्रतिनिधींना हेच आवाहन आहे की लोकांच्या मदतीसाठी पुढे या. कारण तुमच्यात ती धमक आहेे आणि ती दाखवण्याची हीच खरी वेळ आहे. किमान सुरुवातीचे उपाय केले तर टोकाची वेळ येणार नाही. ऑक्सीजन बेड आणि महागड्या औषधांसाठी सर्वसामान्य जनतेला कर्ज काढायची वेळ येणार नाही.

- ऍड. उमेश सुरेशराव अनपट (मुख्य संपादक, MBP Live24)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !