MBP Live24 ब्युरो - ओळखीतील एका अल्पवयीन मुलीला 'फ्लाइंग किस' देणे, वारंवार डोळा मारणे, यासारखे अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. या वागणुकीबद्दल विशेष पोक्सो न्यायालयाने त्याला दोषी ठरवून सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
मुंबईतील मरिन लाइन्स येथील एका चाळीत गेल्या वर्षी २९ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. आरोपी तरुण हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो कामानिमित्त या चाळीत राहत होता. पीडित मुलगी तिच्या बहिणीसोबत बसलेली असताना आरोपीने तिच्याकडे पाहून डोळा मारला आणि वारंवार फ्लाइंग किस दिला.
या मुलीने घरी जाऊन तिच्या आईकडे तक्रार केली. तसेच यापूर्वीही त्या युवकाने असे कृत्य केल्याचे सांगितले. त्यानंतर आईने युवकाला याबाबत जाब विचारला. पण त्याने दोघींनाही जुमानले नाही. त्यामुळे महिलेने एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
विशेष न्यायाधीश यांच्यासमोर चाललेल्या खटल्यात विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी पीडित मुलगी, तिची आई व तपास अधिकारी महिला पोलिस अधिकाऱ्याची साक्ष नोंदवली. आरोपीने त्याच्या बाजूने कोणत्याही साक्षीदाराची साक्ष नोंदवली नाही.
मात्र, मुलीचे कुटुंब आरोपीला वारंवार हीनपणे पहायचे, म्हणून खोट्या प्रकरणात अडकवले. शिवाय पीडितेच्या चुलत भावासोबत पैज लावली होती व त्यातून हे कृत्य झाले, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी मांडला.
शेवटी आरोपीने लैंगिक हेतूने पीडितेचा विनयभंग केल्याचे सिद्ध होते, असा निष्कर्ष नोंदवून न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. त्यानंतर आरोपी गरीब तरुण व कुटुंबात एकमेव कमावता असल्याने शिक्षेत दया दाखवावी, अशी विनंती त्याच्या वकिलांनी कोर्टात केली.
त्यानुसार, न्यायाधीशांनी आरोपीला एक वर्षाची सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली.
पीडितेला भरपाई देण्याचे आदेश
दंडाची रक्कम आरोपीने भरल्यास त्यातून १० हजार हजार रुपये पीडितेला द्यावेत, आरोपी १ मार्च २०२० पासून तुरुंगात असल्याने तो कालावधी शिक्षा कालावधीतून वगळावा, असेही न्यायाधीशांनी आदेशात म्हटले आहे.