औरंगाबाद - हात तुटलेल्या अवस्थेत सापडलेल्या विकास देवीचंद चव्हाण (रा. पाथर्डी) याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी कब्रस्तान परिसरात सापडला होता. याप्रकरणी औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मात्र अजूनही विकासाच्या प्रत्यक्ष मारेकऱ्याचे आणि त्याच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
विकास नगर जिल्ह्यातील अल्हनवाडीतील हरीचा तांडा (ता. पाथर्डी) येथे रहात होता. त्याने विज्ञान शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. पायाने अधू असलेल्या विकासचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याची आजारी आई १० वर्षांपासून पलंगावर झोपून होती.
विकासची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तो दिवस-रात्र बँकेच्या परीक्षेची तयारी करत होता. शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात अधिकारी पदाची परीक्षा होती. औरंगाबाद शहरातील चिकलठाणा येथे त्याची शनिवारी परीक्षा होती.
विकास गुरुवारी दुपारीच गावातून निघाला. आठ दिवसांपूर्वी ऊसतोडीवरून आलेल्या मोठ्या भावाने त्याला संध्याकाळी ७ वाजता पाथर्डीपर्यंत आणून सोडले. रात्री १० वाजेपर्यंत तो एसटीने पैठणमार्गे औरंगाबादमध्ये पोहोचला.
शुक्रवारी सकाळी सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांना मनपाच्या मुख्य इमारतीच्या मागील चितखाना कब्रस्तानमध्ये उजवा हात कापलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यावरून उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, पवार घटनास्थळी दाखल झाले.
विकासाचा गळा, पोटात चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने ६ ते ७ वार केलेले होते. श्वानाने चपलेवरून कब्रस्तानचा दुसरा कोपरा गाठला. तिथे एक बॅग सापडली. त्यात विकासचे परीक्षेचे ओळखपत्र होते. त्यावरून त्याची ओळखपटली. पोलिसांनी पाथर्डी पोलिसांच्या मदतीने विकासच्या गावातील सरपंचाशी संपर्क साधला.
त्यानंतर विकासच्या कुटुंबाला घटनेविषयी माहिती देण्यात आली. दुपारी ३ वाजता ते औरंगाबादमध्ये दाखल झाले. ही घटना ऐकून विकासच्या सख्ख्या भावाला धक्काच बसला. चुलत भाऊ राजेंद्र चव्हाण याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन गावाकडे रवाना झाले.