पारनेर शहरात बेकायदेशीर कोव्हीड सेंटर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्हाभर असे किती बेकायदेशीर कोव्हीड सेंटर आहेत याची तपासणी पारनेरच्या तहसीलदारांप्रमाणेच इतर तालुक्यात करायला हवी. मात्र, तसे होताना दिसत नाही. यामागचे गौडबंगाल काय?
अहमदनगर (MBP LIVE 24 टीम) :
क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरने सुरू केलेल्या बेकायदेशिर कोव्हिड केअर सेंटरचा तहसिलदार ज्योती देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी पर्दाफाश केल्याने गंभीर बाब समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर शहरात हा प्रकार घडला.
पारनेर शहरातील प्रत्येक नागरीकाची रॅपिड चाचणी करून रूग्ण वाढीस आळा घालण्यासबंधीची मोहिम गुरूवारपासून पारनेर शहरात हाती घेण्यात आली आहे. तहसिलदार ज्योती देवरे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, यांच्यासह इतर कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
परवानगीच घेतली नाही
पारनेर बाजार पेठेमधील डॉ. रोहित गांधी यांच्या क्लिनिकमध्ये २० बेड टाकण्यात येउन तेथे उपचार करण्यात येत असल्याचे या मोहिमेअंतर्गत तपासणी सुुरू असताना निदर्शनास आले. रूग्णांची तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याची माहीती उघड झाली. त्याचे समर्पक उत्तर डॉ. गांधी हे देउ शकले नाहीत. तहसिलदार देवरे यांनीं अधिक चौकशी केली असताना रूग्णालय सुरू करण्यासंदर्भातील नोंदणीही डॉ. गांधी यांनी केली नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
कोव्हीड रुग्ण लपवले
कोव्हिड रूग्णालय सुरू केल्यानंतर तेथे दाखल होणाऱ्या रूग्णांची माहीती प्रशासनास देणे बंधनकारक असते. मात्र डॉ. गांधी यांनी प्रशासनास कोणत्याही प्रकारची माहीती न देता कोव्हीड रुग्ण लपवून ठेवले. दाखल असलेल्या रूग्णांना शासन मान्यताप्राप्त कोव्हिड सेंटरला हालविण्यात येऊन पोलिस प्रशासनाने डॉ. गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश तहसिलदार देवरे यांनी दिले.
जिल्हाभर तपासणी आवश्यकपारनेर शहरातच बोगस कोव्हिड सेंटर आढळून आल्याने कोरोना रूग्णांची लुट करण्याचे लोण पारनेर शहरातही पोहचल्याचे उघड झाले आहे. आता जिल्हाभर असे किती बेकायदेशीर कोव्हीड सेंटर आहेत याची तपासणी होणे गरजेचे आहे.