'सुवर्णपदका'चा उदो उदो, घरातील खेळाडूंना मात्र नको !

भारतासाठी (India) पहिले ट्रॅक आणि फील्ड ऑलिम्पिक (Olympic) सुवर्णपदक (gold medal) काल तेवीस वर्षीय नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत जिंकले. त्याच्या या अद्वितीय कामगिरीने देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. त्याच्या सुवर्णपदकाचा उदो उदो केला जात आहे. 

ऑलम्पिक मध्ये दैदिप्यमान कामगिरी बजावणारे नीरज, हॉकी टीम, गोल्फ खेळाडूंची उदाहरणे लोक आपल्या मुलांना देत त्यांचा मनापासून 'उदो उदो' करत आहेत. प्रत्यक्षात मात्र आपल्या मुलांना खेळाडू बनविण्याची वेळ आली की हेच लोक 'नको नको' चा पाढा वाचतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे विविध खेळातील 'स्टार' पाहिले की पालक खेळाबद्दल व त्या खेळाडूंबद्दल प्रकर्षाने व हिरिरीने मत प्रकट करतात. त्याच्या यशाचे कौतुक करतात. मात्र, जेव्हा मुलाला काहीतरी खेळायचे असते, तेव्हा आपण खरोखर त्याच्या प्रतिभेला प्रोत्साहन देतो का? 

त्याच्या खेळाडू वृत्तिकडे तेव्हढ्याच जिज्ञासेने पहातो का? जेव्हढे त्याच्या मार्कांकडे पहातो. याचे उत्तर नाही असेच दिसते. अन्यथा आपल्या देशालाही इतर देशांप्रमाणे अनेक सुवर्ण व इतर पदके अगदी भरभरून मिळाली असती. पण, तसे होताना दिसत नाही


तुम्ही क्रिकेटशिवाय इतर खेळ घरी पाहता अगर खेळता का तेवढ्याच उत्साहाने? मग आपली मुले सेलिब्रिटी होऊन कशी चमकतील ? आणि देशाचा तिरंगा ध्वज कसा सर्वोच फडकवतील? त्यासाठी आपल्या मुलांमधील खेळण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. करिअर म्हणून खेळाकडे पाहण्याची आणि त्यादृष्टीने पाठपुरावा करण्याचीही तेव्हढीच जबाबदारी आहे.

मग, आपल्या मुलांना खेळाच्या उंच शिखरावर पोचलेले पहायचे असल्यास आठवड्यातून फक्त एक पीटी क्लास पुरेसा आहे का? तर नाही. हे देखील तेव्हढेच खरे आहे. त्यासाठी मुलांना शालेय अभ्यासाप्रमाणेच खेळण्याच्या 'प्रशिक्षणा'स देखील स्वतंत्र 'स्पेस' उपलब्ध करून द्यायला हवी. घरात आणि मैदानावरही.

सेलिब्रिटी खेळाडू हे आयुष्यातील करिअर मध्येही 'सक्सेसफूल' आहेत. ते ब्रँड म्हणून जगतात. आपल्या मुलांनाही 'ब्रँड' बनविण्यासाठी पालकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आपल्या मुलांचा आवडता खेळ कोणता आणि त्यात त्याला पुढे नेण्यासाठी काय करता येईल, या दृष्टिकोनातूनही विचार होणे गरजेचे आहे. 

त्याला रोज मैदानावर प्रॅक्टिस साठी जाऊ द्यायला हवे. संबंधित खेळाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचीही गरज आहे. त्यामुळे त्या खेळातील बारकावे मुलांना समजतील आणि सक्सेसच्या दिशेने त्याचा प्रवास जलद गतीने सुरू होईल. ही प्रक्रिया निरंतर सुरू ठेवल्यास यश निश्चित मिळेल.

नीरजची 'सुवर्ण' कामगिरी काल सर्वांनी पाहिली तिचे कौतुकही केले. मात्र, त्याचा सुवर्णपदकापर्यंतचा खडतर प्रवासही तेव्हढ्याच उघड्या डोळ्यांनी पहाणे आणि सूक्ष्मपणे समजून घ्यायला हवा. या प्रवासात त्याच्यासारखे खेळाडू संसाधनांचा अभाव, कौटुंबिक जबाबदारी आणि आर्थिक अडचणी असूनही दररोज अथक परिश्रम करतात. 

'मीराबाई चानू' हिने देखील अथक परिश्रमातून याच ऑलम्पिक मध्ये पदक मिळविले. प्रशिक्षण ठिकाणी जाण्यासाठी पैसे नसतानाही तिने हार मानली नाही. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने प्रवास करून तिने आपल्या खेळण्याची जिद्द बाळगली आणि यशस्वी झाली.

पण ही व्यवस्था बदलण्याची वेळ आली आहे. मुलांना खेळाचे सर्वोत्तम प्रशिक्षण, आधार मिळायला हवा. क्रीडा वर्ग हे इंग्रजी, गणित किंवा इतर कोणत्याही गोष्टीइतकेच महत्वाचे आहेत, ही मानसिकता तयार झाल्यास शेकडो नीरज, मीराबाई चानू देशाचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा आहे.

- नगरी सातारकर

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !