मुंबई - शिवसेना-भाजप युती काळातील माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे अजूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला थांबलेले नाहीत. आता पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे यांना आव्हान दिले आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. इतकेच नाही, तर राणे यांनी ठाकरे यांना 'तारीख आणि वेळ' सांगून पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे.
'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' असे थेट आव्हान नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाजपवर टीका होत होती. त्याचा बदला काढण्यासाठी राणेंनी देखील आपल्या 'प्रहार' या वर्तमानपत्रातून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' या मथळ्याखाली नारायण राणेंचा घणाघाणी 'प्रहार' वाचा उद्याच्या अंकात.. असे सदर छापले गेले आहे. वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर हा मथळा छापलेला आहे.
गुरुवारच्या अंकात राणे हे उद्धव ठाकरेंवर 'हार आणि प्रहार' या शिर्षकाखाली प्रत्युत्तर देणार आहेत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर वापर करत आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला होता. त्यावर आता राणे वर्तमानपत्रातून भाष्य करणार आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खणखणीत व घणाघाणी प्रहार, 'हार आणि प्रहार', उद्याच्या अंकात वाचा' असे प्रहारमध्ये म्हटलेले आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांच्या प्रहाराची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.