मनाेरंजन - दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सर्व विक्रम मोडीत काढणारा 'बाहुबली’ या सिनेमाने हिंदीतही धुमाकूळ घातला. हा सिनेमा आता मराठीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी मराठी स्टारकास्ट देखील निश्चित झाली आहे. मराठी बाहुबली साकारण्यासाठी काही कलाकार एकत्र आले आहेत.
यासाठी डॉ. अमोल कोल्हे, सोनाली कुलकर्णी, संस्कृती बालगुडेसह अनेक मराठी कलाकार एकत्र आले आहेत. मराठमोळया 'बाहुबली'चा दुसरा भाग लवकरच मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटाने एक वेगळा इतिहास निर्माण केलेला आहे.
या चित्रपटाचे गारूड, त्याचा प्रभाव यामुळे प्रत्येकजण हरखून गेला. निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, विराट सेटस् आणि त्याला भव्य, उत्तुंग कलात्मक स्वरूप बाहुबलीच्या यशाचे मापदंड ठरले आहेत. या यशाला मानवंदना देत त्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने भेट आणली आहे.
अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठी ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी उचलली आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यासारखे अनेक नामवंत कलाकार यात असणार आहेत.
मराठी बाहुबलीचे लेखन स्नेहल तरडे यांनी केले आहे. डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला असून देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज असणार आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे.