बीड - जिल्ह्यातील एका घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. वारंवार होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून एका १४ वर्षीय मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे खळबड उडाली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन असून, ती इयत्ता आठवीत आहे. तिच्याच शाळेत शिकत असलेल्या एक मुलगा तिची वारंवार छेड काढायचा. हा प्रकार मुलीने आपल्या घरी सांगितल्यानंतर तिच्या घराच्याने त्या मुलाची समजूत देखील काढली. मात्र तरी देखील त्या मुलाने छेडाछाडीचा प्रयत्न सुरुच ठेवला. त्याला मुलगी कंटाळली.
त्यामुळे अखेर कोणताच पर्याय दिसत नसल्याने या पीडित मुलीने टोकाचे पाऊल उचलले. तिने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तिला तत्काळ उपचारासाठी बीडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलिस करीत आहेत.
या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळकरी मुलींच्या छेडछाडीकडे पालक, शाळा व्यवस्थापन आणि पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे या घटनेमुळे अधोरेखीत झाले आहे. या मुलीची प्रकृती स्थिर होण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ अटोकाट प्रयत्न करीत आहेत.