दुर्गेचे हे सहावे रूप 'कात्यायनी' या नावाने ओळखले जाते. दुर्गापुजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते. ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नावाने संबोधले जाते. दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख 'महिषासुरमर्दिनी' असा केल्याचे नमूद आहे.
महिषासुराचा वध करण्यासाठी देवी पार्वतीने कात्यायन ऋषींच्या पोटी जन्म घेतला. त्यामुळे तिला कात्यायनी हे नाव पडले. देवी पार्वतीचे हे सर्वात रौद्र रूप आहे. त्यामुळे तिला युद्ध देवता सुद्धा म्हणतात. देवी कात्यायनी एका विशाल सिंहावर आरूढ असून तिला चार हात आहेत. तिच्या डाव्या हातांमध्ये कमळ व तलवार असून उजवे हात अभय व वरद मुद्रेत आशिर्वाद रुपी आहेत.
दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायनी देवीचे पूजन करताना गंगाजल, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश करावा, असे सांगितले जाते. तसेच देवीला मालपुआचा नैवेद्यही प्रिय असल्याचे म्हटले जाते.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा करतात. देवीचा अवतार धारण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असल्याचे म्हटले जाते.
शब्दांकन - दिपाली विजय माळी (अ.नगर)