अहमदनगर - एकदा चोरीला गेलेली वस्तू किंवा दागिने सहसा परत मिळण्याची शक्यता कमीच असते. परंतु, नगर तालुका पोलिस मात्र याला अपवाद ठरले आहेत. त्यांच्या कसोेशीने केलेल्या तपासाला यश आले आहे. तसेच त्यांच्या कृतीमुळे माजी सैनिकाच्या घरातील महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान आले आहे.
दि. २७ एप्रिल रोजी घरात घुसून दोन वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ व सोन्याचे मनिमंगळसूत्र असे दागिने जबरी चोरी करून नेले होते. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्याचा तपास नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक बोडखे व नगर तालुका पोलिसांनी केला.
गुंडेगाव येथील माजी सैनिकाच्या घरातील वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी जबरी चोरी करुन नेले होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून अंदाजे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परत मिळवले. तसेच न्यायालीन प्रक्रिया पूर्ण करून महिलांच्या हवाली केले.
त्यांनी तीन आरोपीना अटक करून तब्बल १३ गुन्हे उघडकीस आणले. या गुन्हयापैकी गुंडेगाव गुन्ह्यातील मुद्देमाल नुकताच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून भापकर कुटुंबियांना दागिने सुपूर्त करण्यात आले. यावेळी गुंडेगाव मधील भास्कर कुटुंबीयांनी नगर तालुका पोलिसांचे आभार मानले.
भापकर भगिनी म्हणाल्या, आम्ही असे ऐकले होते की चोरी झाल्यानंतर आपले दागिने आपल्याला परत मिळतील की नाही. पण घटना झाल्यावर सानप साहेब म्हणाले होते की, आजी काळजी करू नका. आम्ही चोरी करणाऱ्यांना लवकरच पकडून तुमचे दागिने तुम्हाला मिळवून देऊ. राजेंद्र साहेब यांनी आम्हाला ते मिळवून दिले.