कुठवर प्रयत्न करायचे? काळावरच सोडून द्यावं सगळं..!

या जगातील कुठल्याही माणसाला आपण पूर्णतः आपल्या बाजूने, अनुकूल करून घेत बसणं, हा काळाचा आणि ऊर्जेचा केवळ अपव्यय आहे, हे एकदा कळलं की अनेक गुंते सुटतात. बऱ्याचदा समोरच्याचं मत बदलणं, गैरसमज दूर होणं, हे आपल्याला तात्काळ हवं असतं. पण प्रत्येकालाच अनुकूल करून घेत बसण्याचा हा अट्टाहास सोडून द्यायला हवा.


जी गोष्ट काळाने करायची असते, ती माणसाने कधीच करू नये. सहजासहजी कुठलंही नातं रुजत नसतं. कारण रुजण्यासाठी आधी ते आकंठ भिजणं गरजेचं असतं. आणि या भिजण्यासाठी प्रसंगी साक्षात समुद्रही समोरच्याच्या प्रेमळ डोळ्यांतला एक थेंब उसना मागतो. त्यात त्याला अजिबात उणेपण वाटत नाही.

आता ज्याला तुमच्याविषयी कांहीच वाटत नसतं, आणि तुम्ही वाळलेल्या झाडाला सतत तुमचं लक्ष, प्रेम सतत देत रहाता.. वेळ गेल्यावर तुम्हांला कळतं. आता या झाडाला प्रेमाची फळ फुलं येणार नाहीत. तेव्हा तुम्ही भ्रममुक्त होता. प्रत्येकाला ही जागं येण.. 'समज' येणं फार महत्त्वाचे आहे.!

बांधकामात वापरल्या जाणाऱ्या विटांना त्यात सिमेंट, काँक्रीट भरताना पकड यावी म्हणून खाचा असतात. पण खोबणी नसलेल्या विटांची भिंत बांधली, तर नक्कीच ती पकड नसल्यामुळे तकलादू बनेल. छोटासा धक्का लागला तरी ती पडेल. ह्या आपुलकीच्या खाचा नात्यातून हद्दपार होताना दिसताहेत..

अगदी तसंच... नात्यात एकमेकांना पकडून ठेवण्यासाठी लागणारा अभाव आणि प्रभाव, सोशिकता आणि आक्रमकपणा दोघांतही आळीपाळीने असावा लागतो. पण मी स्पेशल आहे, स्वतंत्र आहे, असा दावा दोघेही करतात. आणि त्यात परत अवास्तव अपेक्षा डोकावल्या, की मग तर सगळंच संपलं.

जेव्हा नात्याला स्वामित्वाची धार लागते. ही धार समोरच्याची हिंसा व शोषण करते. समोरच्याला आपल्या दावणीला बांधण्यासाठीचे प्रयोग आणि अस्मितांचा संघर्ष सुरू होतो. मग नाती तुटत जातात.. मग ते नातं कुठलेही असो. पतीपत्नीच्या नात्यात दोघांनीही आपण सहचर, म्हणजे बरोबरीने चालणारे आहोत, हे सतत लक्षात ठेवायला हवे.

जिथे स्वामित्व आलं तिथं एक मालक आणि एक नोकर ही भावना असेल. संसार दोघांचा आहे, असं जेव्हा स्त्रीला अन पुरुषालाही वाटेल तेव्हा संसारात सुखाचे मळे फुलतील.! अन्यथा, नात्याच्या चिंध्या होऊन मन दुभंगली जातील. आयुष्यभर त्या जखमांना आपल्याला वागवावं लागेल.

अशा प्रतिकूल परिस्थितीत समोरच्यावर तात्काळ कुठलेही प्रयोग न करता, त्याला मनातल्या मनात अत्यंत विनम्रपणे नमस्कार करून हळूच बाजूला सरकून पुढे निघून जाणे, ही सगळ्यांत सुखावह आणि शहाणपणाची गोष्ट असते. कारण अंतिमतः कोणीच, कोणासोबतच येत नसतो.

पण चालत राहणं हे आपलं काम आहे. चालणं म्हणजे अक्षरशः प्रवाही असणं. प्रवाही माणसं स्वस्थ असतात. थांबलं की प्रॉब्लेम सुरू होतात. ज्याअर्थी आपण विरोधी विचारांवर व्यथित होत आहोत, त्याअर्थी आपलं चालणं थांबलं आहे. अशावेळी त्या विरोधी विचारांना, माणसांना कुठलंही समर्थन, स्पष्टीकरण देऊन त्यांना अनुकूल करून घेण्यासाठी अडून बसू नये. काळावर सोडून द्यावं सगळं.

कारण जीवनात अशी अनेक भयंकर संक्रमणं मागे टाकत चालावं लागतं. परिस्थिती हाताळण्याच्या प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. आणि या कौशल्यावरच आपलं स्वास्थ्य आणि सौंदर्य अवलंबून असतं. म्हणूनच आपली समज अशा उंचीवर आणून ठेवावी, की हे सगळे गुंते लीलया हाताळता येतील.

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !