मुंबई - एका क्रुझ शिपवर शनिवारी रात्री एनसीबीने छापा टाकला होता. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खानच्या मुलाचा समावेश असल्याचे समोर येताच सिनेजगतात एकच खळबळ उडाली आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही त्यांची थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
अंमली पदार्थाच्या या प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा असेल किंवा कोणीही त्यास कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. त्यांनी आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. फिल्म इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात ड्रग्जची लागण झाली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ही बाब समोर आली.
फिल्मी जगतात ड्रग्जचे जाळे पसरले आहे. ड्रग्जमुक्त महाराष्ट्र आणि मुंबईसाठी राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही आठवले म्हणाले. ते डोंबिवलीत बोलत होते. आठवले यांची प्रतिक्रिया थेट आणि स्पष्ट असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेहमीच स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत.
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. यानंतर बॉलीवूडमधून याबाबत संमिश्र प्रतिक्रया येत आहेत. काही कलाकारांना याबाबत लगेचच काही मत व्यक्त करु नका, त्याला वेळ द्या, असे आवाहन केले होते.