खुशखबर ! येत्या १ जानेवारीपासून रंगणार 'मराठी राज्य नाट्य स्पर्धा'

मुंबई - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या १ जानेवारी २०२२ पासून राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर, २०२१ पर्यंत प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत.

नाट्य स्पर्धेकरीता ३ हजार रुपये अनामत रकमेचा धनाकर्ष (डीडी) स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. 

साठाव्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी १ फेब्रुवारी २०२२ पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील. 

हौशी राज्य नाट्य संस्थांनी आपल्या प्रवेशिका आवश्यक त्या कागदपत्रासह खालील पत्त्यावर सादर कराव्यात.

१) मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२ (०२२-२२०४३५५०) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

२) पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड, पुणे (०२०-२६६८६०९९) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

3) औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर- ०२, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद- ४३११००५ (०८७८८८९३५९०) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

४) नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर- ४४००००१ (०७१२-२५५४२११) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, 

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी. 

नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी सांगितले आहे. हौशी नाट्य संघांच्या तयारीला आता वेग येणार आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !