बंगळुरू - जगाचा निरोप घेतलेल्या पुनीत राजकुमारच्या डोळ्यातून चार जणांचे आयुष्य उजळले आहे. पुनीत राजकुुमार हे आपल्या आईप्रमाणेच धर्मादाय कार्यात गुंतत असत. यासाठी त्यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. तो त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण झाला आहे. त्यांचे डोळे नारायण नेत्रालय आय हॉस्पिटलला दान करण्यात आले.
पुनीतचे वडील अभिनेते राजकुमार यांनीही नेत्रदान केले होते. कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत यांचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचाा मृत्यू झाला. त्यांना तत्काळ बेंगळुरूच्या विक्रम रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे प्राणोत्क्रमण झालेले होते.
पुनीत राजकुमार यांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चार जणांचे आयुष्य उजळले आहे. त्यांच्या नेत्रदानाच्या निर्णयामुळे तीन पुरूष व एका महिलेला दृष्टी मिळण्यास मदत झाली आहे. नारायण नेत्रालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. भुजंग शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.
पुनीत राजकुमार यांचे वडील राजकुमार हे दक्षिणेतील सुप्रसिद्ध आणि आदर्श व्यक्तीमत्व आहेत. पुनीत यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. बेट्टाड हूवू या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांचे असंंख्य चाहते आहेत.
त्यांच्या निधनामुळे या चाहत्यांवर मोठी शोककळा पसरली आहे. पुनीत यांच्या मृत्यूनंतर राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद केली होती.