यवतमाळच्या 'त्या' घटनेची शिक्षणमंत्र्यांनीही घेतली गंभीर दखल

यवतमाळ - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काल (बुधवारी) रात्री घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्यावर अज्ञात इसमांनी हल्ला केला. हा प्रकार  रात्री आठ ते नऊच्या सुमारास घडला. हल्ल्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

ही घटना अतिशय गंभीर असून याबाबत यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आला असून या दुर्दैवी घटनेत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

या घटनेच्या मुळाशी जाऊन खोलवर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस अधीक्षक यांनी स्वत: घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !