मुंबई - सुमारे वर्षभराच्या कालावधीनंतर अखेर केंद्र सरकारने तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकार जर आधीच जागे झाले असते तर त्यांचा अपमान नसता झाला. तर शरद पवार म्हणाले की केंद्र सरकारने हा निर्णय निवडणुकीच्या भीतीने घेतला आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच बड्या नेत्यांनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेला शेतकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या देशात सामान्य माणूस काय करू शकतो आणि त्याची ताकद काय आहे याचे हे उदाहरण आहे. सरकारने हे आधीच लक्षात घेतले असते तर आता होतोय, तसा त्यांचा अपमान झाला नसता. हे कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना माझा सलाम आहे.
शरद पवार म्हणाले, भाजपचे प्रतिनिधी गावोगावी जाऊन लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. मोदी सरकारने कायदा करण्यापूर्वी विरोधी पक्ष, शेतकरी नेता किंवा राज्य सरकारशी चर्चा केली नाही. त्याचाच हा परिपाक आहे.
तर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे शिवसेना स्वागत करत आहे. या कृषी विधेयक कायद्याच्या निषेधार्थ ५५० शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलीदानाची किंमत सरकारला कधीच लक्षात न येण्यापेक्षा उशिराने का होईना आली, हे महत्वाचे.