अहमदनगर - 'लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण' या म्हणीची अनुभूती अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत आली. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, नियमांचे पालन करा, असे फर्मान नागरिकांना त्यांनी सोडले. मात्र अन्य मास्क लावून बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीला दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी मात्र मास्क न लावताच कोरोना बाचावाचे धडे देत होते. त्यांच्या या कृतीने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात कोरोना संकट पुन्हा डोके वर काढत आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यातील जिल्हाधिकाऱयांनी ऑनलाईन बैठक घेऊन सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. त्यापार्शवभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल आढावा बैठक घेतली.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाच्या प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये मास्क वापरण्याचे गांभीर्य राहिलेले दिसत नाही. लग्न व इतर कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आढळल्यास तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, महानगरपालिका, नगरपालिकेने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
लग्नाला प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आढळल्यास मंगलकार्यालयाचा परवाना रद्द करत दंडात्मक कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोना संकट टाळण्यासाठी घेण्याच्या उपाय योजनांबाबत खबरदारी कशी घ्यायची याची इथभूत माहिती देत होते.
मात्र, स्वतः डॉक्टर असलेले जिल्हाधिकारी मात्र स्वतः मास्क न लावताच इतरांना मास्क लावण्याचा देत असलेला सल्ला कितपत योग्य, असाच प्रश्न यातून उपस्थित होतो. खर तर अधिकारी वर्गाने स्वतः करावे, मग दुसऱ्यास सांगावे, हे अभिप्रेत असते. मात्र, तसे न झाल्यास तुमचे अनुकरण इतरांनी केल्यास जिल्ह्याला कुठल्या भावात जाईल, अशी भीतीही व्यक्त होते.
मंत्री, पालकमंत्र्यांसोबतही जिल्हाधिकारी विना मास्कच
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या बैठकीत देखील जिल्हाधिकारी मास्क न लावताच बसल्याचे समजते. मग, नागरिकांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जिल्ह्याचे सुप्रिमो म्हणून जिल्हाधिकारी यांनी मास्क (स्वतः मास्क न लावता) लावण्यास सांगने कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होतो.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपजिल्हाधिकारी संदीप नीचीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदी अधिकारी मास्क लावून उपस्थित होते, हे विशेष.