गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्य़ांने 48 लाखांचा घोटाळा केल्याचे समोर आले असून यामुळे खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपविभाग कार्यालयातिल वरिष्ठ लिपिकाला या प्रकर्णप पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कारवाई करण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव सुमीत मेश्राम असून त्याने मार्च 2019 ते जून 2020 पर्यंतचे ग्राहकांकडून 48 लाख 58 हजार 881 रुपये एव्हढी जमा केलेल्या बिलाची रक्कम कंपनीकडे जमा केली नसल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वीज वितरणाचे उप विभागीय अभियंते धम्मदिप फुलझेले यांनी आमगाव पोलिसात तक्रार दिली असून 30 वर्षीय आरोपी सुमित पृथ्वीराज मेश्राम याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी मेश्रामला न्यायालयात हजर केले असता सुमीतला 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी किती लोक आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.