मुंबई - ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. हे कारण पुढे करत एसटी महामंडळाने खबरदारी घेत आहे. ज्येष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे., परिवहन मंत्री तथा अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे.
राज्य परिवहन सेवेतील प्रवासासाठी दि. १ एप्रिल २०२२ पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे या मुदतवाढीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री परब यांनी केले आहे. यापूर्वी स्मार्ट कार्ड योजनेसाठी दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिली जाते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या “स्मार्ट कार्ड” काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे.
एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यात ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याने राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्या पार्श्वभूमिवर प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने, या योजनेला दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.