मुंबई - दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.
हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.
या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबर पासून आता पर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.