ढळढळीत सत्य समोर असताना 'माझी चूकच नाही', असं रेटून बोलणारे वास्तवापासून दूर पळूच शकत नाहीत. इतरांनी त्यांना कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी आपलं काहीच चुकलेलं नाही, असंच ते वारंवार बोलत राहतात. मग समजावून सांगणाऱ्यालाच आपण मूर्ख आहोत की काय, असं वाटायला लागतं.
गोष्टी खूप क्षुल्लक किंवा साध्या असतात. वागण्यात निष्काळजीपणा आला की पुढच्या वेळी तोच निष्काळजीपणा पुढ्यात संकट वाढून ठेवतो. त्याच्याशी दोन हात करण्याची आपली तयारी असो किंवा नसो, आधीच सावध राहिलेलं काय वाईट आहे ? पण गाफील राहून गेलेली व्यक्ती रेटत असेल तर ?
रेटणाऱ्याला यातून काय साध्य होत असेल बरं.? आपण निर्दोष आहोत, हे सांगायचं असेल तर कशासाठी.. कधीकधी किरकोळ गोष्टी चुकतात.. माणसं आहोत, माणसांकडून चुका होणारंच. मग सरळ मान्य करावं ना. पण 'आपलं काहीच चुकलं नाही. समोर परिस्थिती (व्यक्तीच) तशी होती', असं म्हणण्याला काय अर्थ आहे ?
म्हणजे काहीही झालं तरी मी चुकलेलो नाही, हेच त्यांचं म्हणणं. त्यांच्यापुरतं वास्तव. समजून सांगणारा हरेक प्रकारे सांगून पाहतो. का ? तर काळजीपोटी. बरं आपलं चुकलंय हे मान्य करण्यात काय कमीपणा आहे ? उलट समोरचा आपल्याला काहीतरी समजावून सांगतोय, तर आपण पुढच्या वेळी सुधरायला हवं म्हणूनच ना ?
सुरक्षेच्या द़ष्टीकोनातून अमूक एक गोष्ट अशी करू नको सांगितलं, तर लहान मुलही ऐकतं. तेही सावध असतं. अनोळखी माणसं, प्राणी, तऱ्हा.. लक्षात आलं की प्रत्येक सजीव आपोआप सावध होतो. तसं आत्मभान निसर्गाने प्रत्येकालाच दिलंय. मग, कोणीतरी आपल्याला सावध करत असेल तर का नाही व्हावं ?
पण कितीही समजावून सांगितल्यानंतर हे रेटणारे पुन्हा 'नाही, पण...' म्हणायला लागले तर समजावून सांगणाऱ्याला स्वत:चंच डोकं भिंतीवर आपटून घ्यावं वाटतं. काळजीपोटी आपल्या माणसाचं काही नुकसान होऊ नये म्हणून सांगायला जावं तरी त्याला ते मान्यच नाही की आपण कुठेतरी कमी पडलोय.
पण असं मान्य न करणं, आपणच कसे बरोबर होतो रेटत राहणं कितपत योग्य आहे ? म्हणजे काय मिळत असेल त्यातून ? तात्पुरती पळवाट. की पुढच्या वेळचं टप्प्यातलं सावज ? हो. साहजिकच आहे ना ? गेल्या वेळी आपण गाफील होतो हे आपल्याला मान्यच करायचं नसेल तर पुढच्या संकटाला आपणच निमंत्रण देतोय.
शंभर जण काळजीपोटी सांगणारे असतात आपल्याला. पण वाईट इतकंच वाटतं की आपण स्वत: कसे निर्दोष आहोत, हे दाखवण्याच्या नादात स्वत:चाच विनाश ओढवून घेतो. खरं तर तोच आपला प्रवास आहे. अंतिम ध्येयही तेच आहे. पण शेवट गोड व्हावा. 'विनाशकाले विपरित बुद्धी' नकोय.