साताऱ्यातील मोहन मस्कर पाटील या तरुण पत्रकाराचे काल निधन झाले. एका दिलदार मित्राच्या अशा अकाली जाण्यामुळे पत्रकार विश्व हळहळले. मित्राच्या आठवणी भरभरून सांगितल्या जात आहेत.
मोहनचे जाणे त्याच्या संपर्कातील पत्रकारांसाठी धक्कादायक आहेच, शिवाय तमाम पत्रकारांसाठीही चिंतेचे आहे. आपल्या लेखणीतून जगासमोर आलेल्या, समाजातील अनेक घटकांचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांच्या आयुष्याचा, त्यांच्या कौटुंबिक स्थितीचाही विचार व्हायला हवा.
गेल्या काही काळात करोना आणि इतर कारणांमुळे अनेक पत्रकारांचे निधन झाले. त्यामध्ये तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. एका बाजूला पत्रकार म्हणून संघर्ष आणि दुसरीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी संघर्ष. अशा स्थितीत कसाबसा संसार सावरत असताना अचानक घरातील कर्त्याचे निधन झाले, तर कुटुंब कोसळणारच.
पत्रकारिता हे क्षेत्र जरी समाजसेवेची संधी आणि मानसन्मान मिळणारे मानले जात असले तरी इतर काही क्षेत्रांप्रमाणे ते भरवशाचे उपजिविकेचे साधन अद्यापही झालेले नाही. मधल्या काळात सुधारत असलेली स्थिती अलीकडे कोविडमुळे पुन्हा बदलून हे क्षेत्र अनिश्चिततेकडे ओढले गेले.
मुळात अशा संघर्षाची जाणीव असलेले आणि त्याची तयारी असलेले तरुणच याकडे येतात, हेही नाकारून चालणार नाही. तो आमचा आम्ही निवडलेला संघर्ष आहे, त्यासाठी इतरांना दोष देता येणार नाही.
ग्रामीण भागातून आलेल्यांचा संघर्ष जरा जास्त असतो. गावाकडे एक घर, शहरात येऊन थाटलेला नवा संसार, आज ना उद्या चित्र पालटेल या आशेवर सुरू असलेली वाटचाल.
आपल्या कुटुंबापेक्षा समाजाचे प्रश्न मोठे आहेत, असे समजून काम करण्याची वृत्ती, त्या गडबडीत कुटुंबाकडे होत असलेले दुर्लक्ष, गावाकडील आणि शहरातील कुटुंबाच्या स्वाभाविक अपेक्षा, पत्रकार म्हणून सुरू असलेला संघर्ष, वृत्तपत्र वा कंपनीकडून दिलेले टार्गेट, नोकरी टिकविण्यासाठी सुरू असलेली धडपड, काम करताना आपली तत्वे सांभाळण्यासाठी करावी लागणारी कसरत, त्यातून होणारा त्रास हे सर्व सहन करीत त्याला वाटचाल करावी लागते.
यातील कित्येक गोष्टी समाजालाच काय तर स्वत:च्या कुटुंबालाही माहिती नसतात, किंवा त्या सांगायची सोय नसते. असे आयुष्य जगणाऱ्या पत्रकारांना समाज किती समजावून घेतो? किती सहकार्य करतो, एक दोघांसाठी म्हणून सर्वच क्षेत्राची कशी खिल्ली उडविली जाते, या गोष्टी आपण रोज पाहतोच.
सरकार पत्रकारांसाठी काही सवलती देते, योजना आखते. प्रत्यक्षात त्याचा लाभ किती जणांना मिळतो, ही गोष्टही वेगळी. पत्रकारांच्या संघटना आहेत. त्याही अशावेळी मदत करू इच्छितात, पण त्यांनाही मर्यादा आहेत. शेवटी त्याही पत्रकारांच्याच संघटना. त्यामुळे मदत किती आणि कोणाकोणाला कुठपर्यंत करणार ?
मुळात सवलती नकोतच, उत्पन्न वाढेल आणि त्याची शाश्वती मिळेल, अशी धोरणे आखा, असे आमचे म्हणने आहे. मात्र, ही गोष्ट सरकारच्या दृष्टीनेही अडचणीची आहे. शिवाय त्यात पळवाटाही खूप आहेत. त्यामुळे लोकप्रिय सवलतींच्या घोषणा करण्यातच धन्यता मानली जाते.
या सर्वांवर मात करून आमचा संघर्ष सुरूच असतो. जेव्हा अशी घटना घडते, तेव्हा मन विचलित होते. आम्ही आमच्याच आयुष्यात डोकावून पाहतो. मात्र, काही काळात पुन्हा सावरून पुढे चालू लागतो. कारण आम्ही स्वीकारलेला मार्गच असा आहे.